मॅनहोलमध्ये रस्सीने सुरज खाली उतरला, तो आत गुदमरुन तडफडू लागला,अक्कू त्याला वाचवायला गेला,पण तोही…भिवंडीत भयानक दुर्घटना
भिवंडीत भुयारी ड्रेन मार्गिकेचे काम सुरु असताना गुरुवारी सकाळी मेनहॉलच्या सफाई करण्यासाठी आत उतरलेल्या दोघा कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

संजय भोईर, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : – ड्रेनेज लाईनच्या मेनहोलची सफाई करण्यासाठी उतरलेल्या दोघा कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भिवंडी शहरातील कामतघर फेणेपाडा परिसरात गुरुवारी सकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे. सुरज अशोक धोत्रे ( वय २० ) आणि शमशाद अब्दुल जब्बार मोमिन ऊर्फ अक्कू ( वय ५५ ) अशी मृत कामगारांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पालिका आगिशामक दलाच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत मेनहोल मधून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. स्थानिक भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भिवंडी शहरात भुयारी गटार योजना ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम मागील कित्येक वर्षांपासून ईगल इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी करत आहे. ते काम आजही अपूर्ण असून कामतघर फेणे पाडा या रस्त्यावरील ड्रेनेज लाईन चोकअप असल्याची तक्रारी स्थानिक नगरसेवक कमलाकर पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती.पालिका पाणीपुरवठा विभागाने संबंधित ठेकेदार कंपनीला चाचणी व परीक्षण करून काम पूर्ण हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार ठेकेदाराने स्थानिक कामगार शमशाद ऊर्फ अक्कू यास हे काम सोपवले होते.
त्यानंतर त्याने आपल्या ओळखीतील कामगारांना घेऊन फेणेपाडा परिसरातील ड्रेनेज मेनहोल उघडे करून स्वच्छता करीत असताना कोणतीही सुरक्षा न बाळगता सुरज अशोक धोत्रे हा मेनहोल मध्ये उतरला परंतु तो गुदमरू लागल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी अक्कू याने केशव या कामगाराला सांगितले. पण तो घाबरल्याने स्वतः अक्कू त्याला वाचवायला रस्सी पकडून खाली गेला परंतु त्याचाही जीव गुदमरल्याने रस्सी सुटली त्यामुळे तो ही खाली पडल्याने त्याचाही जीव गुदमरून निपचित पडले. या घटनेची माहिती नगरसेवक कमलाकर पाटील यांनी अग्निशामक दलाला दिल्यानंतर अग्निशामक दलाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले.त्यानंतर त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत या दोघांचा मृत्यू झाला होता.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
ही घटना घडून गेल्यानंतर सुमारे एक तासाने या घटनेची माहिती पालिका आपत्कालीन कक्ष आणि प्रशासनाला समजली.परंतु ठेकेदाराकडून येथील ड्रेनेज लाईनचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक कमलाकर पाटील यांनी केला आहे. हे काम करताना ज्या सुरक्षा साहित्यांचा वापर करणे गरजेचे होते. ती कामगारांना न देताच या मेनहोलमध्ये उतरवले होते.त्यामुळे दोघा कामगारांच्या दुर्दैवी मृत्यूला संबंधित ईगल इन्फ्रास्ट्रक्चर ठेकेदार हे जबाबदार असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक कमलाकर पाटील यांनी केली आहे.
सुरज धोत्रे हा रस्सीला पकडून खाली गेला, पण
शमशाद अब्दुल जब्बार मोमिन ऊर्फ अक्कू याने बुधवारी रात्री गुरुवारी कामावर येण्याचे सांगितल्याने आम्ही कामावर सकाळी आलो होतो. मेनहोलमधील कचरा काढण्यासाठी सुरज धोत्रे हा रस्सीला पकडून खाली गेला. पण आतमध्ये गुदमरून तो तडफडू लागला म्हणून अक्कू स्वतः खाली त्याला वाचवायला गेला पण त्यालाही त्रास होऊन तोही खाली पडला अशी माहिती सोबत कामावर असणाऱ्या केशव याने दिली आहे.