Video : आमदाराच्या कन्येच्या लग्नात खऱ्याखुऱ्या पैशांचा पाऊस, झाडूने गोळा केल्या नोटा
आमदार अनंत सिंह यांच्या कन्येच्या भव्य लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. या शाही विवाहसोहळ्यात लाखो रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडण्यात आला. विशेष म्हणजे, जमिनीवर पडलेल्या या नोटा झाडूने गोळा कराव्या लागल्या, याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घोडेस्वारी, व्हीव्हीआयपी पाहुणे आणि भव्य मेजवानीसह हा विवाह संपन्न झाला.

गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेला एक शाही विवाह काल अखेर संपन्न झाला. बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची कन्या शिवांगीचा विवाह काल रात्री संपन्न झाला. यावेळी व्हीव्हीआयपी पाहुणे उपस्थित होते. घोडेस्वारी, लाखो लोकांना जेवणाची मेजवाणी, भव्य सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे या लग्नाला चांगलीच रंगत आली होती. या लग्नातील आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे पैशांचा पाऊस. या लग्नात लाखो रुपयांच्या नोटांचा पाऊस झाला. एवढा पैसा लग्नात उधळला गेला की झाडूने नोटा गोळा कराव्या लागल्या. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बुधवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी रात्री बिहटा येथून रणवीर सिंह यांचे चिरंजीव ऋषिकेश कुमार वरात घेऊन अनंत सिंह यांच्या घरी लदमा येथे आले होते. त्यानंतर नवरदेव आणि नवरीने भव्य मंचावर एकमेकांना पुष्पहार अर्पण केले. वैदिक रितीरिवाजानुसार कन्यादान पार पडलं. वैदिक मंत्रोच्चार आणि मंगलगीत सुरू असतानाच ऋषिकेश यांनी शिवांगीला कुंकू लावलं. त्यानंतर आज सकाळी नवरी नवरदेवाच्या घरी जायला निघाली. मात्र, या लग्नातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लग्नात 10, 20, 50 रुपयांच्या नोटांचा खच जमिनीवर पडलेला दिसून येत असून झाडूने या नोटा गोळा केल्या जात असल्याचं दिसून येत आहे.
Millions of rupees in cash were showered at the wedding of the daughter of strongman leader Anant Singh .
So many notes were scattered on the ground that they had to be swept up with a broom and handed to the dancers..
https://t.co/Bx8iP1YZ8B
— Rash (@SRMPHD26) November 26, 2026
भरभरून पैसा उडवला
25 तारखेला वरात येण्याच्या आदल्या दिवशी अनंत सिंह यांच्या मुलाचं उपनयन संस्कार होते. त्यापूर्वी 23 मार्च रोजी हळदीचा कार्यक्रम होता. तर 24 तारखेला मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडला. या तिन्ही वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात नृत्य आणि गाणं होतं. कलाकारांनी आपल्या कलेचा जलवा यावेळी दाखवला. यावेळी अनंत सिंह यांचे समर्थक आणि नातेवाईक या संगीतमय कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी या मैफलीत प्रचंड पैसा उडवला. कुणी 10 रुपयाच्या नोटांचे बंडल उधळले, कुणी 20 तर कुणी 50 रुपयांच्या नोटांचे बंडल उधळले. पैशाचा एवढा पाऊस पडला की तो गोळा करणाऱ्यांचे हात थकले, पण पैशांचा पाऊस काही कमी झाली नाही. शेवटी हातात झाडू घेऊन हा नोटांचा ढिग जमा करावा लागला. त्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
महिला कलाकारांनी पैसे घेतले नाही
शिवांगीच्या हळदीच्या दिवशीही रात्रभर नाचगाण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिला डान्सरने डान्स करून सर्वांनाच थिरकायला भाग पाडलं. त्यावेळी काही लोकांनी नोटा उधळल्या. त्यावेळी एक महिला डान्सर डान्स करत होती. एका व्यक्तीने जमिनीवरील काही नोटा उचलल्या आणि त्या महिला डान्सरच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. पण या महिला डान्सरने नोटा घेण्यास नकार दिला. तिने हात जोडून नम्रपणे नकार दिला.
