अजितदादांच्या राष्ट्रवादीत दोन गट? पक्षात नेमकं काय घडतंय?

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मात्र याचदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे.

अजितदादांच्या राष्ट्रवादीत दोन गट? पक्षात नेमकं काय घडतंय?
sunetra pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 8:24 PM

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गोटामध्ये घडामोडींना वेग आला आहे. यावरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दोन गट पडले आहेत का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह इतर काही महत्त्वाच्या नेत्यांचा सहभाग होता. दरम्यान यावेळी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान ही सर्व चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रुग्णालयात असताना प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीची देखील जोरदार चर्चा झाली. तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षात नाराज असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. सुनील तटकरे यांना डावललं जात असल्याची भावना मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे.

Loading...

दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक बोलावली होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  शरद पवारांकडून फोन येतात का? अशी विचारणा या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी आमदारांना केल्याची माहिती देखील समोर येत आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत शुक्रवारी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये संसद भवन परिसरात जवळपास 35  मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडी पाहाता राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दोन गट पडले आहेत का? एकीकडे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us