
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात कोणीच मुस्लिम नव्हतं असा दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला. तसेच मुस्लिम लोकांकडून मटण खरेदी न करता हिंदू लोकांकडून करा असे वक्तव्यही त्यांनी केलं. हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानातून मटण खरेदी करावे, असे आवाहन त्यांनी केलं असून त्यामुळे आता राज्यात नवा वाद पेटला आहे. मात्र त्यांच्या या विधानानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) नितेश राणेंना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम असा कधी भेदभाव केला नाही, असे उदयनराजे भोसले म्हणाले. तसेच मल्हार सर्टिफिकेशनच्या मुद्यावरही ते स्पष्ट बोलले. मी नॉनव्हेज खात नाही ज्याला खायचं त्यांनी खावं, असा एक टोलाही त्यांनी लगावला. कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते
काय म्हणाले उदयनराजे भोसले ?
नितेश राणे यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही. सर्वधर्म समभाव अशीच त्यांची भूमिका होती, संकल्पना होती. त्यांनी जर असा काही भेदभाव केला असता तर आपण आजही मुघलांच्या गुलामगिरीत असतो. हिंदू मुस्लिम असा कधी भेदभाव केला नाही, असा पुनरुच्चार उदयनराजे भोसले यांनी केला. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे ते खोदून काढा, असं नितेश राणेंना म्हणायचं असेल. मी किती वेळा तरी सांगितलं आहे. तो आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो हे विसरू नका. मात्र याचा असा तसा अर्थ काढू नका, असे उदयनराजे भोसले यांनी बजावलं.
मी तर नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं, असा टोला देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला. मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट (Malhar Certificate) देण्याचा निर्धार मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांनी केला. त्याच पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले हे म्हणाले. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस (Meat) खरेदी करू नका, असे आवाहन देखील नितेश राणे यांनी केले होतं.
मल्हार सर्टिफिकेशनवरून मार्तंड संस्थांच्या विश्वस्तांमध्ये मतभेद नाही
दरम्यान मल्हार सर्टिफिकेशनवरून मार्तंड संस्थांच्या विश्वस्तांमध्ये मतभेद नाही, विश्वस्त मंडळाचा मल्हार नावाला पाठिंब आहे, विश्वस्थानच्या बैठकीत बहुमताने निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील मटनाला मल्हार सर्टिफिकेट देण्याचे नितेश राणे यांनी सांगितलं होतं. मात्र यानंतर श्रीमार्तंड देवसंस्थानाच्या विश्वस्थांमध्ये या नावावरून मतभेद पाहायला मिळाले. पण आता श्रीमार्तंड देवसंस्थानाच्यावतीने आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. याबाबत देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते यांनी या योजनेला विश्वस्त मंडळाचा पाठिंबा असल्याच स्पष्ट केलं.
मल्हार सर्टिफिकेशन किंवा झटका मटण म्हणजे काय?
मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हिंदूंची मटण चिकनची दुकाने उघडली जातील. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम च्या माध्यमातून हिंदू समाजातील खाटिक वर्गांना प्रमाणपत्र मिळणार आहेत. मटण विकणारा हिंदूच असेल आणि मटणात भेसळ नसेल असा दावा आहे. तसेच हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानातून मटण खरेदी करावी असं आव्हान नितेश राणे यांनी केला