Sanjay Raut : महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार – संजय राऊत

शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीबाबतच्या चर्चांना संजय राऊत यांनी अजूनही पूर्णविराम दिलेला नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या कल्याणासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची जनतेची इच्छा असून, याबाबत उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली. शिंदे गटावर आणि अमित शाह यांच्यावरही त्यांनी कडाडून टीका केली.

Sanjay Raut : महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार - संजय राऊत
sanjay raut
| Updated on: Jun 19, 2025 | 11:03 AM

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मनोमीलन आणि शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अशा अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. मात्र त्याचवेळी गेल्या आठवड्यात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला वेगळंच वळण मिळालं. त्याचदरम्यान जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटातर्फे जाहीर करण्यात आली. मग त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आहे का ? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी एका वाक्यात स्पष्ट उत्तर दिलं. ” आम्ही महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो, मराठी माणसाला सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे”, असे म्हणत राऊतांनी युतीच्या चर्चांना अजूनही पूर्णविराम दिलेला नसून ती दारं अद्याप खुली असल्याचे सूतोवाच केले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ही राज्याच्या जनतेची, लोकांची इच्छा आहे. त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरेंनी केला आहे. तो वेगळा विषय आहे, महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे. आणि आज संध्याकाळी वर्धापन दिनाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी मला अपेक्षा आहे, असेही राऊत म्हणाले.

त्यांनी संस्थापक म्हणून अमित शाह यांचा फोटो टाकला पाहिजे, शिंदेना टोला

या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. आज आमचा वर्धापन दिन आहे. काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापन दिन साजरा करत आहेत. माझ्या घरासमोर त्यांच्या जाहिराती लागल्या. त्यावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला आहे. काय संबंध त्यांचा बाळासाहेब ठाकरेंशी? त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे नाही. त्यांनी संस्थापक म्हणून अमित शाह यांचा फोटो टाकला पाहिजे असा टोला राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शाह किंवा मोदी आहेत. त्यांनी समोर अमित शाह यांचा फोटो टाकला पाहिजे. त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन गुजरातमध्ये अहमदाबाद किंवा सुरतला केला पाहिजे. त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे? असा सवालही राऊतांनी विचारला,

त्यांचा महाराष्ट्राशी अजिबात संबंध नाही, पण ते करत आहेत. कारण अमित शाह यांना ते हवंय. मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसात भ्रम निर्माण व्हावा हे शाह यांना हवंय. मराठी माणसात तुकडे पडावे हे अमित शाह आणि मोदींचं स्वप्न आहे. ते पार करण्यासाठी शिंदे गट तयार केला. आनंद दिघे यांचा फोटो त्यांनी टाकला आहे. आनंद दिघे हे काही शिवसेनाप्रमुख नव्हते. ते ठाणे जिल्हा प्रमुख होते, असं राऊत म्हणाले.

ते कधीही तुटेपर्यंत ताणत नाही

मनसेसोबत जाण्याचा निर्णय घेण्यापेक्षाही मी असं म्हणेल. दोन्ही बाजूला सकारात्मकता आहे. असं होऊ नये असं कोणी म्हणणार नाही. तुम्ही रस्त्यावर कुणालाही विचारलं तरी ते हेच सांगतील. ही लोकभावना आम्ही मराठी माणूस म्हणून ओळखू शकलो नाही तर तो महाराष्ट्रावर अन्याय ठरेल. उद्धव ठाकरे हे अशा विचाराचे आणि स्वभावाचे आहेत. ते कधीही तुटेपर्यंत ताणत नाहीत. त्यांच्या स्पष्ट आणि परखड भूमिका असतात. महाराष्ट्रावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्ती, महाराष्ट्राला शत्रू समजणाऱ्या लोकांसोबत हातमिळवणी करता येणार नाही, ती महाराष्ट्राशी बेईमानी ठरेल असं उद्धव ठाकरेंचं मत आहे. ही सुद्धा लोकभावनाच आहे ना, असं राऊतांनी नमूद केलं.

शिंदेंवर कडाडून टीका

यावेळी राऊतांनी एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका केली. शिंदेंचा एक गट आहे. तो अघोरी विद्येतून निर्माण झाला आहे. हा गट सर्वत्र असतो. धर्मक्षेत्रात असतो, राजकीय क्षेत्रात असतो. त्यांच्याकडे फार गांभीर्याने पाहायची गरज नाही. दिवस रात्र ते अघोरी विद्येत असतात. माझा कसा फायदा होईल हे पाहत असतात. ही अंधश्रद्धा असली तरी आपल्या पुरोगामीपणाला डाग लावणारं हे कृत्य आहे. अशा लोकांच्या हातात राजकारण गेलं असेल तर महाराष्ट्राचं कमालीचं दुर्देव आहे. कोणत्या प्रकारचे लोक फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत. फडणवीस यांनी बैठकीला बसण्यापूर्वी खुर्चीखाली वाकून पाहिलं पाहिजे असा सल्लाही राऊतांनी दिला.