उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, त्या अटीमुळे मविआ अडचणीत? घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांनी आपल्या मित्र पक्षांकडे केलेल्या मागणीमुळे महाविकास आघाडीमधील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, त्या अटीमुळे मविआ अडचणीत? घडामोडींना वेग
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2025 | 4:26 PM

पाच जुलै रोजी मुंबईत विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते, या मेळाव्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला आणखी जोर चढला. मात्र अद्याप दोन्ही पैकी कोणत्याही पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये.

दुसरीकडे महायुतीमधील अनेक नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र महाविकास आघाडीचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या कशा लढवायच्या हे शिवसेना ठाकरे गटाकडून ठरवलं जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्र पक्षाच्या भूमिकेनंतर शिवसेना ठाकरे गट आपली रणनीती ठरवणार आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आगामी महापालिका निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून लढवणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं आहे, अशी मागणी केल्याची माहिती देखील समोर आली आहे. लोकसभेनंतर इंडिया आघाडीची पुढची रणनीती काय? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केल्याची माहिती समोर येत आहे. बिहार निवडणूक आम्ही लढत नसलो तरी बैठक आवश्यक, असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या अटीमुळे आता महाविकास आघाडीपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पाच जुलैनंतर सातत्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधून बाहेर पडतील आणि तिसरा गट स्थापन होईल, असं मत महायुतीमधील काही नेत्यांनी व्यक्त केलं आहे, त्यामुळे या निवडणुकीबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.