Zilla Parishad Election 2026 | नदीतूनच प्रवास… मतदार म्हणतात, रस्ता नाही, तर मत नाही; परभणीतील उमेदवारांना टेन्शन
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोथ गावात ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची घटना समोर आली आहे. या गावाला जाण्यासाठी अद्यापही पक्क्या रस्त्याची सोय नसून, कर्परा नदीवर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदीतून प्रवास करावा लागतो. या मूलभूत समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी मतदान न करण्याचा निर्धार केला आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांच्याअंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली असून, विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.या निवडणुकीत परभणी जिल्हा परिषदेचाही समावेश असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज परभणी जिल्ह्यातील एकूण 1 हजार 278 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. शांततापूर्ण आणि सुरळीत मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोथ गावात ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची घटना समोर आली आहे. या गावाला जाण्यासाठी अद्यापही पक्क्या रस्त्याची सोय नसून, कर्परा नदीवर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदीतून प्रवास करावा लागतो. या मूलभूत समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी मतदान न करण्याचा निर्धार केला आहे. “रस्ता नाही तर मत नाही”, “आश्वासनं नको, प्रत्यक्ष विकास हवा” अशा घोषणा देत महिला मतदारांसह ग्रामस्थांनी हातात बॅनर घेऊन मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

