गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक, थेट उदाहरण देऊन सरकारला घेरलं!

राज्यात सर्वत्र एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर मिळावे यासाठी लोक रांग लावताना दिसत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरलं आहे.

गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक, थेट उदाहरण देऊन सरकारला घेरलं!
lpg gas shortage
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2026 | 5:28 PM

Uddhav Thackeray : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धाची होरपळ ही संपूर्ण भारताला बसत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रालाही या युद्धाची झळ सहन करावी लागत आहे. नवी मुंबईपासून ते गडचिरोली, वाशीम यासारख्या जिल्ह्यांमध्येही घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस बुकिंग करूनही सिलिंडर मिळवण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. दुसरीकडे राज्यात एलपीजीचा पुरेसा साठा आहे, असा दावा केला जात आहे. राज्य सरकारच्या या दाव्यानंतर आता माजी मुख्यमंत्री तथा आमदार उद्धव ठाकरे यांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यांनी एलपीजीचा मुद्दा उपस्थित करून सरकारला उघडं पाडलं आहे.

तर राज्याचं कठीण आहे…

सरकार एलपीजी गॅस सिलिंडरची टंचाई नाही असे म्हणत आहे. मग रस्त्यावर सिलिंडरसाठी टंचाई का दिसत आहे. मला तर माहिती मिळाली आहे की फक्त मुंबईतीलच 30-40 टक्के रेस्टॉरंट्स बंद होत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे सामान्य जनता होरपळत असेल आणि ही बाब जर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत असेल तर त्यांच्या यंत्रणेत गलथानपणा आहे. जी व्यक्ती जनतेची व्यथा जाणून घेत नाही किंवा व्यथा समजूनही असं काहीच नाहीये, असं मुख्यमंत्री म्हणत असतील तर राज्याचं कठीण आहे.

मोदींनी सांगितलेला प्रयोगही करून पाहिला पण…

शेवटी गॅस टंचाई आणि महागाई यात फरक आहे. गॅसची किंमत का वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला गॅस निर्मितीचा एक प्रयोग करून पाहिला आहे. परंतु तराही गॅस टंचाई होतच आहे. असे का होत आहे, ते सरकारने सांगावे, असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करा

दुसरीकडे विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधकांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळेच आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.  त्यामुळे आता भविष्यात विरोधी पक्षनेत्याची निवड होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us