माशेलकरांचा अहवाल आला, पण एकही पान… उद्धव ठाकरे यांची मोठी प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी माशेलकर समितीच्या अहवालावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता, त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

माशेलकरांचा अहवाल आला, पण एकही पान... उद्धव ठाकरे यांची मोठी प्रतिक्रिया
| Updated on: Jun 29, 2025 | 8:58 PM

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही जीआर मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये  बोलताना उद्धव ठाकरे यांनीच अहवाल स्विकारला होता, असंही फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. त्यामुळे ते मी जीआर काढल्याचं म्हणत आहे. एक पोस्टर काढा,  त्यावर फडणवीस यांचा फोटो लावून अफवांची फॅक्ट्री लिहा, मुख्यमंत्र्यांना मराठी कळते का. त्यात मराठी सक्तीची केली आहे. ही समिती उच्च शिक्षणासाठी समिती नेमली होती. उदय सामंत मंत्री होते. माशेलकर यांची समिती होती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यावर आपण काय करायचं म्हणून समिती नेमली होती.

तो अहवाल मंत्रिमंडळासमोर आला. त्याची अंमलबजावणी करायची की नाही त्यासाठी अभ्यासगट माझ्या नेतृत्वात नेमला होता. त्यानंतर यांनी सरकार पाडलं. ज्या शिफारशी माशेलकर यांनी केल्या होत्या त्याचं पानही आम्ही उघडून पाहिलं नाही. आमचं सरकार गेलं. मग यांनी जीआर काढला.

मी जीआर काढला म्हणता तर मग तीन वर्ष झोपा काढत होते का? तीन वर्ष कुणालाच कळलं नाही मी जीआर काढल्याचं. मीच माझ्या जीआरची होळी करेन? मी मराठी सक्तीची केली. ते मराठी नीट वाचा, समजून घ्या आणि मग बोला. मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे. मी अहवाल वाचलाच नाही. माझ्याकडे आला. पण सरकार गेलं. श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल आला. त्यावर चर्चा करून फेटाळला. वाजपेयींनी तो स्वीकारायला भाग पाडला. त्याचा त्रास शिवसैनिकांना झाला. भाजपला नाही. म्हणजे अहवालाची प्रक्रिया केली. माशेलकरांची समिती नेमली. त्यांनी अहवाल सादर केला. त्यावर अभ्यासगट तयार केला. तो अहवाल माझ्याकडे आलाच नाही. मी वाचलाच नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.