Uddhav Thackeray : शरद पवार राष्ट्रवादीने अजित पवारांच्या पुतळ्यासमोर बसून..विलिनीकरण, सत्तेत जाण्याच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंची मार्मिक टिप्पणी
Uddhav Thackeray : डिलिमिटेशनबद्दलही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये स्पष्टता नाहीय. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. माझं मत विचारलं तर मी सांगेन'

शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी काल अखेर पत्रकार परिषद घेऊन तो मफलर मॅन कोण? याचा उलगडा केला. त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला. देवेंद्र फडणवीस हे वीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा रोहित पवार यांचा आरोप आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “एकूण घटनाक्रम पाहिला तर वीएसआर कंपनीवर कारवाई झालेली दिसत नाही. रोहित पवार जे म्हणतायत त्यात वावगं आहे असं म्हणण्याचं कारण नाही. त्यांच्याकडे पुरावे असतील तर अमित शाहंनी त्यांचे फोन उचलावेत” शरद पवार यांच्या पक्षात विलिनीकरणाबद्दल, सत्तेत जाण्याबद्दल संभ्रमावस्था दिसून येते, त्यावर उद्धव ठाकरे यांनी मार्मिक टिप्पणी केली. अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे नेते होते. त्यामुळे त्यांच्या पुतळ्यासमोर बसून निर्णय घ्यावा.
डिलिमिटेशनबद्दलही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये स्पष्टता नाहीय. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. माझं मत विचारलं तर मी सांगेन’ अमित शाह काल पुण्यात अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते. त्यावेळी अमित शाह म्हणाले की, कोविड काळात फोन केल्यावर अजित पवार उपलब्ध असायचे. पण उद्धव ठाकरेंशी संपर्क होत नव्हता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. “अमित शाह किती दिवसांनी अवतीर्ण झालेत. कारण दिल्लीत जेन झी वर अत्याचार केल्यानंतर लोकसभेत बाथरुमला जायचे पण सभागृहात येत नव्हते. असा हा चकाट्या पिटणार गृहमंत्री आहे, त्यांनी आपल्या कारकिर्दीत चकाट्या पिटण्याखेरीज काय केलय” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
नाक रगडून माफी मागितली पाहिजे होती
“अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्याच अजित पवार यांच्या पुतळ्याचं या चकाट्या पिटणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते अनावरण होणं ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. अनावरण केल्यानंतर अजित पवार यांच्या पुतळ्यासमोर अमित शाह यांनी नाक रगडून माफी मागितली पाहिजे होती. आम्ही तुमच्यावर केलेले आरोप खोटे होते. अजित पवार हयात असताना हे दोन शब्द बोलले असते तर अजित पवारांना सुद्धा समाधान लाभलं असतं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“कोरोना काळात गंगेत शव सोडले जात होते. गुजरातमध्ये सामूहिक चिता पेटल्या होत्या. ते चित्र महाराष्ट्रात दिसलं नाही. मोदींना थाळ्या पिटून जे जमलं नाही ते महाराष्ट्राने करुन दाखवलं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.