Ujjwal Nikam : “ते 10 अतिरेकी बिनडोक होते, पण त्यांना शिकवणारा महाराष्ट्रातलाच!” उज्ज्वल निकम यांनी उलगडला थरार
Ujjwal Nikam : पाकिस्तानातून सूत्रं हलवणारा महाराष्ट्रातलाच! उज्ज्वल निकम यांचा 26/11 हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, 'ते 10 अतिरेकी बिनडोक होते, पण त्यांना शिकवणारा महाराष्ट्रातलाच अन्...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उज्ज्वल निकम यांच्या वक्तव्याची चर्चा...

Ujjwal Nikam : 26/11 हल्ल्याला 17 वर्ष झाली आहे, पण आजही 26 नोव्हेंबर हा दिवस उजाडला की मुंबईवर हल्ला करून अवघ्या देशाला वेठीस धरणाऱ्या त्या काळ्या दिवसाच्या आठवणी ताज्या होतात. शत्रू राष्ट्राने केलेल्या त्या भयानक हल्ल्यानंतर पूर्ण मुंबई हादरलेली. या हल्ल्यांत अनेकांनी प्राण गमावले. ही घटना कधीच विसरता न येण्यासारखीच आहे. मुंबईच्या काळजात आजही हल्ल्याच्या त्या जखमा भळभळत आहेत, पण अशा कित्येक जखमा झेलत जगण्याच्या शर्यतीत पुढे राहते तीच खरी मुंबई, हे वारंवार सिद्ध होतं. या हल्ल्यानंतरही मुंबईने हेच तर दाखवून दिले. कितीही हल्ले झाले तरी मुंबई कधीच मागे राहिली नाही आणि राहणार देखील नाही.
26/11 हल्ला झाल्यानंतर त्या भयानक घटनेवर आधारित अनेक सिनेमे देखील साकारण्यात आले. पण कोणत्याच सिनेमातून एक सत्य जगासमोर आलं नाही, ते सत्य सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ‘बोल भिडू’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. मुलाखतीत निकम यांनी मोठा थरार उलगडला आहे. पाकिस्तानातून सूत्रं हलवणारा महाराष्ट्रातलाच होता… असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आहे.
उज्ज्वल निकम म्हणाले, माझ्याकडे एक एक्स्लूसीव्ह आहे…. असं म्हणत त्यांनी 26/11 च्या रात्री कराचीच्या कंट्रोल रूममध्ये नेमकं काय घडलं? याबद्दल त्यांनी सांगितलं. उज्ज्वल निकम यांनी सांगितल्यानुसार, कराची याठिकाणी जी कंट्रोल रुम होती, त्या रुममध्ये 4 – 5 लोकं बसलेली होती. सर्वात महत्त्वाच म्हणजे, ती 4 – 5 लोकं थेट हल्लेखोरांसोबत बोलत होते आणि हल्लेखोर चॅनेलवाल्यांसोबत बोलत होते…
माझ्याकडे एक मोठं एक्स्लूसीव्ह आहे, असं सांगत निकम म्हणाले, ‘त्यांच्यामध्ये जे 10 अतिरेकी होते ते, पंजाबी मुस्लिम होते, पण त्यांनाा हिंदी भाषा नीट बोलता येत नव्हती… अशात त्यांना कराची येथील सांगण्यात येत होतं की, ‘ऐसा तुम हिंदी बोलो….’ म्हणजे, असं तुम्ही हिंदी बोला…, ते अतिरेकी सर्व काही लिहून घेत होते…
पुढे उज्ज्वल निकम म्हणाले, ‘ते सर्व बिनडोक (अतिरेकी) सर्व लिहून घेत होते… पण तेथून सांगणारा स्पष्ट हिंदी बोलू शकत होता. तो हिंदी भाषेत बोलणारा, भारतीय होत…’ एवढंच नाही तर निकम असं देखील म्हणाले की, ‘ तो हिंदी बोलणारा महाराष्ट्रातला होता आणि हेच सत्य आहे… ‘,सांगायचं झालं तर, 26/11 हल्ल्याविरोधात उज्ज्वल निकम यांनीच कोर्टात बाजू मांडली होती.
