Uddhav Thackeray: मला पाठिंबा देता आला असता, पण…; डिलिमिटेशन विधेयकाला विरोध का? उद्धव ठाकरेंनी सांगितली 3 मोठी कारणं!
Why Is Uddhav Thackeray Opposing Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधामागे उद्धव ठाकरेंनी मोठा दावा केला आहे. त्यांनी विरोधाचं कारण सांगितलं आहे.

देशात सध्या डीलिमिटेशन बिलाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. इंडिया आघाडी या विधेयकाला विरोध करत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाही या विधेयकाला कडाडून विरोध आहे. यावर आता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचा या विधेयकाला विरोध का आहे, यामागचं नेमकं कारण काय, याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले आहे. तसेच त्यांनी मोठा खुलासा करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्या मांडलं जाणारं विधेयक दुर्दैवाने मंजूर झालं तर त्याचा त्रास संपूर्ण देशाला होणार आहे. मला या विधेयकाला पाठिंबा देता आला असता पण मी पक्षापेक्षा महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघतो. हा विचार केल्यावर काही गोष्टी लक्षात आल्या. ती कारणं शिवसेनेच्या भूमिकेमागे आहेत. यावर अनेक जणांनी मते व्यक्त केली आहे. आम्ही या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका का घेतली? तर पहिलं कारण म्हणजे हे सीमांकन ठरवण्याचा ज्याला अधिकार दिलेला आहे ती समिती. ज्यांच्यावर मतचोरीचा आरोप झालेला आहे, तो सिद्धही झालेला आहे. त्यांना काढावं ही देशातून मागणी होत आहे. तरीही ज्याने मतचोरी केली त्या ज्ञानेश कुमारांना या समितीवर ठेवलं आहे.
ते म्हणाले की, ही समिती तीन जणांची आहे. यात एक ज्ञानेश कुमार आहेत. एक सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असणार आहेत. ते न्यायाधीश कोण आणि त्यांना कोणी निवडलं याचा अधिकार मोदी आणि शहांचा आहे. म्हणजे ज्ञानेश कुमार त्यांचाच माणूस, तसेच हे न्यायाधीशही त्यांचाच माणूस असणार आहे. तसेच यातील तिसरी व्यक्ती ज्ञानेश कुमार निवडणार आहेत. म्हणजे त्यांचाच माणून असणार आहे. म्हणजे या विरोधाचं मतच व्यक्त केलं जाणार नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ही समिती फास आहे. काय करायचं त्याची स्क्रिप्ट भाजपकडे तयार आहे. ही स्क्रिप्ट घेऊन सह्या मारून जनतेसमोर आणायची हे या समितीचं काम आहे. ही समिती चुकीची आहे. या समितीत कोण कोण असायला हवं? तर मागील एका समितीमध्ये एक सरन्यायाधीश होते. तसेच एक मंत्री होता आणि एक विरोधी पक्षनेता यांची नेमणूक केली होती. म्हणजे तीन जणांचा बेंच त्या समितीला धरलं असतं तर दोन विरुद्ध एक म्हणजे विरोधी पक्षाचं मत विचारात घेतलं जाणार नाही. त्यामुळे ही पद्धतच चुकीची आहे.
ते पुढे म्हणाले की, ही मतचोरी उघडपणे केलेली आहे. या मतचोरीत ज्यांचा सहभाग आहे, ती सर्व माणसं यात असणार आहेत. निवृत्त न्यायाधिश घेतले म्हणजे आमचं समाधान होतं असं नाही. हे निवृत्त न्यायाधिश कोण आहेत, यात अभय ओक यांना का घेत नाही? असे काही निस्वार्थ देशाची आपुलकी असणाऱ्यांना या समितीत घ्या. पण यात कुणाचा समावेश केला आहे, याबद्दल काही कळलं नाही. पण त्यांचे मम नाही बोलणारे निवृत्त न्यायाधिश यात घेतले असतील.
दुसरी गोष्ट म्हणजे जे सीमांकन होईल त्यात लोकसभेच्या वाढवताना राज्यसभेच्या वाढणार आहेत का, याबाबत काही माहिती नाही. राज्यसभेच्या जागा वाढतील असं नाही आहे. हे सीमांकन जे होईल ते हीच समिती करणार आहे. पण ते कसं करणार त्याचा चांगला अनुभव शिवसेनेने २०१७ मध्ये मुंबई महापालिकेत घेतला आहे. भाजपने देशाचा असा अभ्यास केला आहे की, महापालिका जिल्हापरिषद यातील याद्यांचा अभ्यास केला आहे. कोणत्या पक्षाला कुठून जास्त मतदान केलं जातं याचा हे त्यांनी काढलं आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.