
मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुण्यातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळला, जीथे हा भाग कोसळला त्या भागात भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हे भुयार सापडल्यानंतर या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानावर आक्षेप घेत, ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आता या भुयाराची पुरातत्व विभागाकडून पहाणी करण्यात येणार आहे, इथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान याबाबत माहिती देताना पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितलं की, आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तातडीनं आमचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. घटनास्थळाची पहाणी करण्यात आली असून, काल रात्री देखील आम्ही दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मंचर शहरातील सर्व धर्मीय लोकांनी आमच्या आवाहानाला प्रतिसाद देत शहरात शांतता ठेवली आहे. एसआरपीफच्या दोन तुकड्या तिथे तैनात करण्यात आल्या आहेत.
आज आम्ही त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे, सकाळपासून दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून शेवटी हा एक मार्ग निघालेला आहे, सर्वांनी शांतता राखण्याचं मान्य केलं आहे. आमचा 200 लोकांचा बंदोबस्त या ठिकाणी सध्या आहे, अशी माहिती रमेश चोपडे यांनी दिली आहे.
तर दर्गाच्या दुरुस्तीचे काम मंचर नगरपंचायतच्या वतीने सुरू आहे, दुरुस्तीचे काम करत असताना या वास्तूचा पुढील भाग कोसळला, तिथे एक भुयार आढळून आलं आहे. यावर काही संघटनांनी आक्षेप नोंदवल्यानंतर वाद होऊ नये, म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आज सकाळी या ठिकाणी प्रशासनाने पाहणी केली आहे, दोन्ही समाजातील नागरिकांमध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे, अशी माहिती आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.