राज्यात दुष्काळ जाहीर! पण आता रामदास आठवलेंची सरकारकडे नवी मागणी, पक्षाबद्दलही महत्त्वाचं वक्तव्य

Ramdas Athawale News : सध्या राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली असून राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. पण आता कोकणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

राज्यात दुष्काळ जाहीर! पण आता रामदास आठवलेंची सरकारकडे नवी मागणी, पक्षाबद्दलही महत्त्वाचं वक्तव्य
Ramdas Athawale
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 8:28 PM

पवन येवले, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : राज्यात दुष्काळ जाहीर झाला असून शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ होणे आवश्यक असून कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली. चवदार तळ्याच्या आंदोलनाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित केलेली रॅली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले. आरपीआय सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन पक्ष वाढवत असून, आणखी दोन राज्यांत मान्यता मिळाल्यास तो राष्ट्रीय पक्ष होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, राज्यात सत्तेत योग्य वाटा मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “आम्हाला दोन महामंडळे आणि एक आमदारकी हवी आहे. आम्ही दोन खासदार निवडून आणू,” असे ते म्हणाले. सरकारला अल्टीमेटम देण्याबाबत बोलताना, “मी सरकारला अल्टीमेटम देऊ शकत नाही, सरकारच मला अल्टीमेटम देईल,” अशी त्यांच्या अंदाजात खास प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Loading...

ईव्हीएम आणि विरोधकांच्या आंदोलनावर बोलताना आठवले म्हणाले की, ईव्हीएम काँग्रेसनेच आणले असून सरकार आणि निवडणूक आयोगाचे कोणतेही लागेबांधे नाहीत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य नसून अनावश्यक आंदोलने करू नयेत. बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तरी आम्हाला अडचण नाही, उलट आमचेच मतदान वाढेल असे ते म्हणाले.

२०२९ च्या निवडणुकांबाबत भाष्य करताना, राहुल गांधींनी काहीही केले तरी त्यांच्या जागा कमीच होतील आणि नरेंद्र मोदी चौथ्यांदा पंतप्रधान होतील व आपण पुन्हा मंत्री होऊ, असा दावा त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एनडीएमध्ये यावे, तसेच नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू आम्हाला सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, प्रकाश लोंढे यांच्यावर पोलिसांकडून काही प्रमाणात अन्याय झाला असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us