राज्यात अवकाळी, शेतकरी संकटात, अचानक आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान

| Updated on: Jan 06, 2024 | 11:56 AM

unseasonal rain | राज्यातील काही भागांत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. ऐन थंडीत पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांना स्वेटर सोडून छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नात पाऊस पडला.

राज्यात अवकाळी, शेतकरी संकटात, अचानक आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान
Follow us on

पुणे, दि. 6 जानेवारी 2024 | राज्यातील अनेक भागांत पुन्हा अवकाळ पाऊस झाला आहे. हवामान विभागाने राज्यांत शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात आलेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस झाला. शेत आणि शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही या पावसाचा फटका बसला. त्यांच्या मुलाचे शुक्रवारी लग्न होते. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरात पाऊस झाला.

बुलढाणा जिल्ह्यात पाऊस

बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यांत शुक्रवारी आणि शनिवारी अवकाळी पाऊस पडत आहे. मोताळा तालुक्यांमध्ये पाऊस झाल्यावर आता खामगाव तालुक्यात सुद्धा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, तूर, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात सुद्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसला होता. आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

जळगाव, नगर जिल्ह्यात पाऊस

अहमदनगरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पाऊस सुरू झाला. ऐन थंडीत पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांना स्वेटर सोडून छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. या पावसाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे. नागरिकांच्या आरोग्यसह पावसामुळे हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांवरही होणार आहे. जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या व काढणीला आलेला तूर पिकाला फटका बसला आहे. मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, हरभरा, मका तसेच शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेली तूर पीक खराब झाले. शेतकरी तिसऱ्यांदा अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे.

हे सुद्धा वाचा

अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नात पाऊस

संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नात पाऊस पडला. यामुळे वधूवरा सोबत वऱ्हाडी मंडळीही पावसामध्ये भिजली. दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. त्या सर्वांना पावसाचा फटका बसला.

पालघरमध्ये पावसाची शक्यता

पालघर जिल्ह्यात 8 जानेवारीला एक दोन ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नैऋत्य अरबी समुद्रात सक्रिय चक्रवाताच्या स्थितीमुळे पालघर जिल्ह्यात 8 जानेवारी रोजी एक दोन ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. राज्यात पुढील पाच दिवस वातावरण अंशत ढगाळ राहण्याची शक्यताही वर्तविली आहे. पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने पुढील पाच दिवस कमाल व किमान तापमानात चढ उतार दिसून येईल.