
उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जळगावमध्ये सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. आज सकाळपासून जळगावसह जिल्ह्याती ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक वारा सुटला आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची धांदल उडाली. जळगावसह धुळे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरामध्ये अवकाळी पावसाने लोकांना चांगलेच झोडपले. जवळपास अर्धा तास चाललेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे गहू, मका, ज्वारी, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर शिरपूर तालुक्यातील भाटपूरा परिसरात गारपीट झाली, यामुळे केळी, पपई आणि गहू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातही काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. सातपुडा पट्ट्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसानीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसापूर्वी आंब्याच्या झाडांना मोहोर आला होता, मात्र आता हा मोहर जमिनीवर गळून पडला आहे. यामुळे आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, पपई आणि आंबा आणि इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आणि परिसरात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे आठवडे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तसेच नाशिकच्या नांदगाव तालुक्यात अनेक गावात अचानक पावसाने हजेरी लावली. तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यावर या पावसाचा परिणाम होणार आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे लागवड केलेल्या कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगावात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे बहिणाबाई महोत्सवातील बचत गटांच्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले आहे. अर्धा ते पाऊण तासापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे महोत्सवातील विक्रेत्यांच्या स्टॉलमध्ये पावसाचे पाणी साचले. त्यामुळे वस्तूंचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या मंडपाचे कापड फाटले. तसेच वॉटरप्रूफ मंडप नसल्याने पावसाचे पाणी थेट बचत गटांच्या स्टॉलमध्ये शिरले. एका बचत गटाचे सात ते दहा हजार रुपयापर्यंत नुकसान झाल्याची माहिती बचत गटाच्या विक्रेत्या महिलांनी दिली आहे.