
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबरमध्ये या पुतळ्याचं उद्घाटन झालं. त्यानंतर आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. यावरून विरोधक आक्रमक झालेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं वैभव नाईक म्हणालेत. लोकसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाणांनी नारायण राणेंच्यासाठी महराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारातील पैसे वापरले, असा आरोप नाईकांनी केलाय.
आज आम्ही आक्रोश मोर्चा काढतोय. शिवप्रेमींचा संताप आज सरकारला दिसेल. लोकसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणे यांच्यासाठी याच भ्रष्टाचारातील पैसे वापरले. राणे यांच्यासाठी मताला एक हजार रुपये वाटल्यामुळेच आता राणेंकडून पालकमंत्र्यांची पाठ राखण होत आहे. देशातल्या कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देणारे नारायण राणे आणि नितेश राणे गप्प का होते?, असं सवाल त्यांनी केलाय.
पुतळा प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न होतोय. मंत्रिमंडळातील एका मंत्र्याकडून दोघांनाही अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सिंधुदुर्ग मधल्या वकिलांना फोन येत आहेत. या प्रकरणात आम्ही राजकारण केलं नाही. उलट पुतळा बसवला. त्यावेळी भाजपचे झेंडे लावले होते. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की पुतळा पडला कसा? हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा आहे, असं वैभव नाईक म्हणाले.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी नागरिकांचा संताप पाहायला मिळतोय. मालवणमधील बाजारपेठ आज उत्सर्तपणे बंद ठेवण्यात आली आहे. भरड नाका इथली दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बाजारपेठ बंद आहे. राजकीय पक्षांकडून नव्हे तर स्थानिकांनी हा बंद पाळला आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्याच्या बरोबर समोर असणाऱ्या घरातल्या व्यक्तींने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला त्या दिवशीची परिस्थिती सांगितली. ज्या दिवशी पुतळा कोसळला त्या दिवशी खूप जोरदार वारं होतं. पाऊस आणि वारा एकत्र झाल्याने वाऱ्याचा वेग अधिक वाढला. वाऱ्याचा वेग पुतळा पाडणे एवढा होता का हे माहीत नाही मात्र त्यादिवशी वाऱ्याचा वेग अधिक होता, असं राजकोट किल्ल्यासमोरील घरात राहणाऱ्या व्यक्तीने सांगितलं.