उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळला, संपूर्ण तालुकाच शिंदे गटात विलीन, कुठे काय घडलं?

वेंगुर्ल्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह ३०० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. निवडणुकीपूर्वी ही ठाकरे गटासाठी मोठी पिछेहाट मानली जात आहे.

उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळला, संपूर्ण तालुकाच शिंदे गटात विलीन, कुठे काय घडलं?
uddhav thackeray eknath shinde
| Updated on: Jan 20, 2026 | 6:23 PM

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र याच बालेकिल्ल्यात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ्या गळतीचा सामना करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह ३०० हून अधिक सक्रिय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या मोठ्या राजकीय भूकंपामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच ठाकरे गटाची ताकद कमालीची घटली आहे.

ठाकरे गटाच्या अस्तित्वाला सुरुंग

वेंगुर्ला तालुक्यातील ठाकरे गटाच्या अस्तित्वाला सुरुंग लावत अनेक दिग्गज नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये ठाकरे गटाचे भक्कम आधारस्तंभ मानले जाणारे तालुकाप्रमुख यशवंत परब, युवा सेनेचे तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता परब, माजी शहर प्रमुख अजित राऊळ आणि माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांसारख्या अनुभवी लोकप्रतिनिधींनी शिंदे गटाची वाट धरली आहे. एकाच वेळी तालुक्यातील प्रमुख फळी आणि ३०० हून अधिक सक्रिय कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्यामुळे ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी पूर्णपणे कोलमडली आहे. आगामी निवडणुकीत याचे गंभीर परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सावंतवाडी-वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंत्री केसरकर यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करताना म्हटले की, “राज्यात होत असलेल्या विकासकामांची ही पावती आहे. वेंगुर्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि या नवीन सहकाऱ्यांमुळे आमची शक्ती द्विगुणित झाली आहे.”

ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय

सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा मोक्याच्या क्षणी पूर्ण तालुका कार्यकारिणीच शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दक्षिण कोकणात संघटनात्मक पकड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांनंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारे पक्षांतर ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.