विदर्भात उष्णतेची लाट, 24 तासांत 8 जणांचा मृत्यू? संपूर्ण राज्यात खळबळ
विदर्भात उन्हाचा कहर पाहायला मिळत असून नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्माघाताने ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेचा कडाका प्रचंड वाढला आहे. त्यातही विदर्भात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. गेल्या २४ तासांत यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात उष्माघाताने एकूण ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ४ जणांचे मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यातच हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे.
यवतमाळमध्ये एकाच दिवशी चौघांचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेची लाट अतिशय तीव्र झाली आहे. त्यामुळे शनिवारी एकाच दिवशी ४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यवतमाळच्या दिग्रस शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी ३ जणांचे मृतदेह आढळून आले. एकाच दिवशी शहरात ३ मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून, उर्वरित दोघांची ओळख पटवण्याचे काम अद्याप पोलीस करत आहेत.
तर बाभूळगाव तालुक्यातील गवंडी गावाजवळ असलेल्या पुलाखाली ६० वर्षीय मारोतराव कोवे हे मृतावस्थेत आढळून आले. तीव्र उष्णतेमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नागपुरात उष्माघातामुळे ४ बळी गेल्याची शक्यता
नागपूर जिल्ह्यातही सूर्यदेवतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. शनिवारी नागपूर शहरात तापमानाचा पारा तब्बल ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या उष्णतेच्या लाटेमुळे नागपूर शहरात २ आणि सावनेर तालुक्यात २ अशा एकूण ४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर शहरातील सक्करदरा आणि यशोधरा नगर परिसरात दोन अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तर नागपूर ग्रामीणमधील सावनेर परिसरातही उष्णतेमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व मृत्यू उष्माघातानेच झाले आहेत का, याचा तपास पोलीस आणि आरोग्य प्रशासन करत आहे. त्यांचा शवविच्छेदन अहवाल (Post-Mortem Report) आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
वाढत्या तापमानामुळे विदर्भातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागात आज उष्णतेचा कहर राहण्याचा अंदाज आहे. तर नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात एकीकडे तापमानात मोठी वाढ झाल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच शेतातील किंवा इतर कष्टाची व अतिश्रमाची कामे दुपारच्या वेळी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.