
राज्यात मराठा आरक्षणाचा जीआर निघाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये चांगलीच जुंफली असल्याचे चित्र आहे. दररोज मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन नव्या आरोप आणि प्रत्यारोपांचा पाऊस पडत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांना फाशी देण्याची भाषा केली आहे. 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाच्या विरोधात बोलणाऱ्यांना विरोध करा, असे जर मनोज जरांगेचे म्हणणे असेल तर त्यांच्या हाती AK-47 द्या आणि ओबीसी समाजाचा खात्मा करायला सांगा अशी प्रतिक्रिया देखील विजय वडेट्टीवार यांनी केली होती.
विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करत, ‘आमचा जीव गेल्यावर जरांगेंना फाशी द्या, आम्ही चिठ्ठी लिहू. आता करू देत ना, काय करेल तो मारूनच टाकेल ना मनोज जरांगे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल. जीव घेणारा कोण आहे ते आम्ही चिठ्ठी लिहून ठेवू. जरांगेला फाशीवर चढवा म्हणून आमचा जीव गेल्यावर. पहिली फाशी त्याला द्या. तो आमचा जीव घ्यायला सांगतो ना? तर सरकारने त्याच्यावर कारवाई करेल. गुन्हे दाखल करतील आणि फासावर चढवतील ना’ असे म्हटले आहे.
वाचा: गौतमी पाटीलची दर महिन्याची कमाई किती? आकडा वाचून फुटेल घाम
मनोज जरांगे यांना गरीब मुलांसाठी आरक्षण हवे, त्यात नोकरी मिळत आहे. मात्र जरांगे यांना राजकीय आरक्षण हवे म्हणून त्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘शासनाचा जीअर महाराष्ट्रातील 374 जातींवर अन्याय करणारा आहे, हे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आम्ही 10 ऑक्टोबरला मोर्चा काढणार आहोत. या जीआर मधला पात्र शब्द सुद्धा वगळावा. पहिल्यांदा मात्र हा शब्द नव्हता, नंतरच्या एक तासात जीआरमध्ये पात्र शब्द टाकला आहे आणि ऑनलाईन सिग्नेचर घेतलेला आहे. हा सगळा निर्णय दबावात झालेला आहे, एखादा प्रस्थापित समाज ज्याच्याकडे सगळं काही आहे. सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्या आहे, यात जर काही गरीब लोक असलेले त्याच्यासाठी ईडब्ल्यूएसची व्यवस्था आहे. त्यांना ओबीसीमधूनच आरक्षण द्या, अशी मागणी चुकी आहे.’