काँग्रेस आमदाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ! आरोग्य संघटना आक्रमक

| Updated on: May 10, 2021 | 9:20 PM

काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची एक ऑडिओ क्लिपही सध्या व्हायरल होत आहे.

काँग्रेस आमदाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ! आरोग्य संघटना आक्रमक
काँग्रेस आमदार रणजित कांबळे
Follow us on

वर्धा : कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी प्रचंड मेहनत घेत आहेत. जिवाची पर्वा न करता हे सर्वजण कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. अशावेळी काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची एक ऑडिओ क्लिपही सध्या व्हायरल होत आहे. लॉकडाऊन असतानाही विना परवानगी कॅम्प भरवल्यानं आमदार संतप्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, आमदार कांबळे यांनी केलेल्या शिवीगाळीनंतर जिल्ह्यातील आरोग्य संघटना आक्रमक झाली आहे. (Congress MLA Ranjit Kamble Swearing Wardha district health officials)

काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवागीळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिलीय. कांबळे यांनी दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केलीय.

आरोग्य शिबीर आयोजित केल्यानं शिवीगाळ?

9 मे रोजी नाचन गाव इथं एक आरोग्य शिबीर भरवण्यात आलं. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असतानाही नेत्यांच्या उपस्थितीत शाळेमध्ये शिबीर घेण्यात आलं. मतदारसंघात होणाऱ्या चाचणी शिबिराची माहिती आपल्याला दिली गेली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या आमदार कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत आरोग्य संघटनेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कांबळे यांच्या वर्तनाचा निषेध व्यक्त केलाय. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत कारवाईची मागणी केलीय.

आमदार कांबळे यांची आरोग्य अधिकाऱ्यांना धमकी

“तुला चपलेने मारणार, तु मला भेट आता. तुला चपलेनं मारलं नाही तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटत असेल की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार, अशा शब्दात कांबळे यांनी डॉ. डवले यांना धमकी दिल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याचे संकेत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, ‘म्युकरमायकोसिस’चा उपचार आता म.फुले जनआरोग्य योजनेतून होणार

Congress MLA Ranjit Kamble Swearing Wardha district health officials