शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय, उभारलं मोठं आंदोलन; प्रमुख मागण्या काय?

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप २०२४ च्या अतिवृष्टीने झालेल्या पिक नुकसानीची भरपाई आणि विमा रक्कम मिळण्यात होणारा विलंब याविरुद्ध मोठे आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले.

शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय, उभारलं मोठं आंदोलन; प्रमुख मागण्या काय?
| Edited By: | Updated on: Apr 24, 2025 | 8:20 PM

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अजूनही खरीप २०२४ मधील अतिवृष्टी आणि निसर्गाच्या कोपामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी संघर्ष करत आहेत. पीकविमा योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी विमा हप्ते भरूनही अद्याप त्यांना विमा रक्कम प्राप्त झालेली नाही. शासनाकडून जाहीर झालेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई सुद्धा वितरित झालेली नाही. या अन्यायाविरोधात आवाज उठवत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेले हजारो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी आपल्या पीकविमा क्लेमशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रत सुद्धा सादर केली. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी मॅडम यांना अधिकृत निवेदन देखील देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?

1. खरीप २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट आणि तात्काळ पीकविमा रक्कम देण्यात यावी.

2. शासनाकडून जाहीर झालेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.

3. रब्बी हंगाम २०२३ साठी फक्त काही शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळालेली आहे. ही रक्कम सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावी.

संघटनेकडून इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री लवकरच वाशिम जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यांच्या भेटीच्या वेळी हे निवेदन त्यांना वैयक्तिकरित्या देण्यात येणार असून, त्यानंतरही जर शासन आणि विमा कंपनीने योग्य प्रतिसाद दिला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने न्यायालयीन लढाई लढण्यात येईल. शेतकऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही, असा ठाम इशारा संघटनेकडून देण्यात आला. या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनासह विमा कंपनीवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे. हजारो शेतकऱ्यांच्या भावना आणि उद्विग्नतेचा विस्फोट आजच्या आंदोलनात प्रकर्षाने दिसून आला.