Pravin Togadia : वाईट नियत ठेऊन महिलांजवळ जाणाऱ्याला बसणार इलेक्ट्रिक शॉक, प्रवीण तोगडिया काय म्हणाले?

Pravin Togadia : "हिंदू समाजाने खरेदी-विक्री व रोजगारात परस्परांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शाळा-कॉलेजांमध्ये ‘सावधान अभियान’ राबवून मुलींना जागरूक करण्यावर भर देण्यात येणार आहे"

Pravin Togadia : वाईट नियत ठेऊन महिलांजवळ जाणाऱ्याला बसणार इलेक्ट्रिक शॉक, प्रवीण तोगडिया काय म्हणाले?
Pravin Togadia
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 18, 2026 | 1:48 PM

“महाराष्ट्रात लव्ह जिहाद व धर्मांतर सुरू असून देशातील कोणताही भाग यापासून मुक्त नाही. देशात याचा हल्ला मुघलांच्या काळाप्रमाणे सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला. काही कॉर्पोरेट क्षेत्रातही धर्मांतराचे प्रकार होत असल्याचा दावा करत अमरावतीतील उदाहरण त्यांनी दिले. हे थांबले नाही तर गावागावात छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतील” असा इशारा प्रवीण तोगडिया यांनी दिला. ते आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचे संस्थापक अध्यक्ष आहेत. नाशिकमधील षड्यंत्राचा महिला पोलिसांनी भांडाफोड केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. आरोपींना फाशी द्यावी किंवा पकडले गेले नाहीत तर एन्काऊंटर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

हिंदू समाजाने खरेदी-विक्री व रोजगारात परस्परांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शाळा-कॉलेजांमध्ये ‘सावधान अभियान’ राबवून मुलींना जागरूक करण्यावर भर देण्यात येणार आहे. महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे आवश्यक असून त्यासाठी उपक्रम राबवले जातील. महिलांच्या सुरक्षेसाठी पर्समध्ये ठेवता येईल असे इलेक्ट्रिक शॉक देणारे उपकरण विकसित करण्यावर काम सुरू आहे” असं प्रवीण तोगडिया यांनी सांगितलं. तसच चिली स्प्रेपेक्षा प्रभावी साधन तयार करण्याचा दावा केला.

‘काचेवाणी गावावर रोहिंग्यांचा कब्जा’

मदरसे बंद करून तेथील मुलांना मुख्य प्रवाहात आणून शिक्षित करण्याची मागणी त्यांनी केली. सर्व मदरशांना टाळं लागलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस चांगले काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.मात्र देशभर लव्ह जिहाद वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. गोंदिया जिल्ह्यातील काचेवाणी गावावर रोहिंग्यांनी कब्जा केल्याचा आरोप त्यांनी केला. हिंदू राष्ट्राचा प्रश्न चर्चेचा विषय असू शकतो, पण हिंदू समाज लक्ष्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.

एन्काऊंटर करण्याची मागणी

देशभरातील सहा महिन्यांच्या प्रवासात 250 जिल्हे व 1500 तहसीलांचा दौरा पूर्ण झाल्याचे प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. ‘हनुमान चालीसा’ केंद्रांच्या माध्यमातून सामाजिक व आरोग्य उपक्रम राबवले जाणार असून दरमहा गरजू कुटुंबांना धान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. अमरावती प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून एन्काऊंटर करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली तसेच बनावट कागदपत्रांपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Follow Us