NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर भाजपची भूमिका आली समोर, सुनेत्रा पवार जो काही निर्णय घेतली त्याला..
NCP Merger : "संजय राऊतांनी उद्धव ठाकरे पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन करणार, दिवाळीत, डिसेंबरमध्ये ते पंचागात बघून सांगावं. एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून" असं नवनाथ बन म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार रुग्णालयात होते. त्यांना अजित पवार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल भेटायला गेले. दोघांमध्ये बोलणं सुरु असताना शरद पवार म्हणाले की, 10 तारखेनंतर बोलू. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? ही चर्चा सुरु झाली. यावरुन विविध राजकीय तर्क-वितर्क सुरु आहेत. संजय राऊतांना आता भाजपंकडून उत्तर देण्यात आलं आहे. “संजय राऊत हे उबाठा गटाचे प्रति पक्षप्रमुख आहेत. उबाठा गटाचे जेवढे निर्णय उद्धव ठाकरे घेत नाहीत, तेवढे निर्णय संजय राऊत घेतात. उबाठाचं काँग्रेसमध्ये कधी विलिनीकरण करायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार संजय राऊत यांना आहे” अशी टीका भाजपं प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली.
“राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण करायचं की नाही याचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील. सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील, त्या निर्णयाला भाजपचं पूर्ण समर्थन असेल. पण शरद पवार साहेब स्वत:चा निर्णय घ्यायला सक्षम आहेत. शरद पवारांचं गुलामी करण्याचं काम इतकी वर्ष संजय राऊत यांनी केलं आहे. शरद पवार आपला निर्णय संजय राऊत यांच्या माध्यमातून सांगणार नाहीत. एवढे सक्षम, ताकदवान नेते शरद पवार आहेत” असं नवनाथ बन म्हणाले. “शरद पवारांना निर्णय घोषित करण्यासाठी संजय राऊतांसारख्या नेत्याची गरज नाही. शरद पवार स्वत: निर्णय घेतील. संजय राऊतांनी उद्धव ठाकरे पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन करणार, दिवाळीत, डिसेंबरमध्ये ते पंचागात बघून सांगावं. एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून” असं नवनाथ बन म्हणाले.
आदित्य ठाकरे संजय राऊतांची कॉलर पकडतात
पार्थ पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांना किंमत देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. “हाच न्याय लावायचा असेल तर आदित्य ठाकरे संजय राऊतांना किती किंमत देतात?. आदित्य ठाकरे संजय राऊतांची कॉलर पकडतात, दोघांमध्ये हमरी-तुमरी झाल्याच्या बातम्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळल्या. आदित्य ठाकरेंना कंटाळून एकनाथ शिंदे बाहेर पडले, शिवसेनेचे 40 आमदार बाहेर पडले. संजय राऊतांवर आता काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ आली आहे किंवा अख्खा उबाठा घेऊन काँग्रेसमध्ये जातील. पार्थ पवारांवर बोलण्यापेक्षा संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंचा इतिहास पहावा. आदित्य ठाकरेंना वैतागून शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत हा सामना अनेक वर्ष पहायला मिळतोय” असा दावा भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला.