Weather Update : राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस, मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम, हवामान विभागाचा मोठा इशारा

राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे, परंतु विदर्भात मात्र अजूनही उष्णतेची लाट पहायल मिळत आहे. आज पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Weather Update : राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस, मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम, हवामान विभागाचा मोठा इशारा
Weather Update
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 24, 2026 | 7:23 PM

राज्यातील काही भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या आहेत. दरम्यान या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उष्णतेपासून दिसाला मिळाला आहे. मात्र दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याचं पहायला मिळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान आहे? त्याबद्दल.

अमरावतीला उष्णतेचा रेड अलर्ट

Loading...

आजही अमरावती जिल्ह्याला भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्यापासून 26 तारखेपर्यंत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असणार आहे. शनिवारी अमरावती जिल्ह्यात 45. 4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती.  सलग बारा दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पहायला मिळत असून, वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

नागरिक उन्हामुळे हैराण झाले आहेत. आज अमरावतीमध्ये उष्णतेच्या रेड अलर्टचा शेवटचा दिवस असून, उद्यापासून 26 तारखेपर्यंत अमरावती जिल्ह्यासह विदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, दुसरीकडे या उष्णतेचा मानवी आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून अमरावतीत उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागतात,  त्यामुळे दुचाकीस्वार किंवा पायी चालणारे  लोक खबरदारी म्हणून दुपट्टे किंवा स्कार्फ बांधूनच फिरताना दिसत आहेत.

गोंदियात 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 

गेल्या तीन ते चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा पुन्हा वाढताना दिसत आहे. जिल्ह्याचे तापमान तब्बल 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावरही होताना दिसत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेत मजुरांना उष्माघात, डोकेदुखी आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवत आहे. डॉक्टरांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गडचिरोलीमध्येही हाय अलर्ट 

गडचिरोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या प्रचंड तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं आहे. दोन दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात तब्बल  46.2 अंश सेल्सिअस एवढ्या जास्त तापमानाची नोंद झाली होती. तापमानाचा मोठा फटका हा नागरिकांना बसत असून, वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी वाढली आहे, मात्र दुसरीकडे उष्णतेमुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार देखील घडत आहेत.  मागील पंधरा दिवसापासून तापमानाच्या तडाखा गडचिरोलीकरांना सहन करावा लागत असून पावसाळा कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत गडचिरोलीकर आहेत

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us