सावधान! अवकाळीचं सावट अजून संपलं नाही, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना; ‘हे’ दिवस काळजी घ्या!

| Updated on: Mar 10, 2023 | 3:51 PM

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाची सूचना देण्यात आली आहे.

सावधान! अवकाळीचं सावट अजून संपलं नाही, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना; हे दिवस काळजी घ्या!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

छत्रपती संभाजीनगर | राज्यात होळी (Holi) आणि धुळवडीदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 5 ते 8 मार्च हे चार दिवस मराठवाडा, विदर्भासह कोकण किनारपट्टीवरील बहुतांश भागांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं. यामुळे काढणीस आलेल्या पिकंचं मोठं नुकसान झालं. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरु आहेत.  सध्या औरंगाबाद, जालना, परभणीसह विदर्भातील वाशिम, नंदुरबार, आदी भागात स्वच्छ सूर्यप्रकाश दिसून येत आहे. त्यामुळे अवकाळीचं सावट दूर गेलंय, असं वाटतंय. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांनी राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या सरी कोसळू शकतात. प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने नवा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

13, 14मार्च रोजी पावसाची शक्यता

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 13मार्ज रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तर दिनांक 14 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हा प्रभाव दिसून येईल.  मराठवाड्यात साधारण १६ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहिल.

23 मार्चपर्यंत तापमानात घसरण

सॅक, इस्रो अहमदाबाद यांच्याद्वारे जारी केलेल्या उपग्रह छायाचित्रांवरून सदर अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिनांक 17 ते 23 मार्च या कालावधीत पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच 22 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दरम्यान देखील मराठवाड्यात तापमान घसरलेलेच दिसून येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाची सूचना देण्यात आली आहे. 13 आमि 14 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याने काढणीस तयार असलेल्या द्राक्ष वा इतर फळांची काढणी करून घ्यावी. तसेच फळधारणा सुरु असलेल्या आंबे बहार, संत्रा, मोसंबी बागेस गरजेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. वादळामुळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.

तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाल्याचीही काढणी करून घ्यावी. टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी सुरक्षित ठिकाणी करावी.या दिवशी जनावरांना उघड्यावर सोडू किंवा बांधू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.