रात्रभर बंगल्यात झाडाझडती… चेहरा बघून भविष्य सांगणाऱ्या ज्योतिष खरातची संपत्ती पाहून डोकंच गरागरा फिरेल; सिन्नरच नाही, शिर्डी आणि…

महिलेवर अत्याचाराचा आरोप असणारा नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या बंगल्याची पोलिसांकडून झाडाझडती सुरु आहे. अशातच त्याच्या संपत्तीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

रात्रभर बंगल्यात झाडाझडती... चेहरा बघून भविष्य सांगणाऱ्या ज्योतिष खरातची संपत्ती पाहून डोकंच गरागरा फिरेल; सिन्नरच नाही, शिर्डी आणि...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 19, 2026 | 10:39 AM

Nashik : स्वघोषित कॅप्टन अशोक खरात याच्याविरोधातील कारवाईत आता वेग आला असून त्याच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या संपत्तीचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत अशोक खरात याने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केल्याची चर्चा आहे. नाशिक शहरात त्याचा आलिशान बंगला आणि कार्यालय असून पाथर्डी परिसरात सुमारे 30 एकर जमीन असल्याचे समोर आले आहे. याशिवाय सिन्नर, ओझर विमानतळ परिसर तसेच शिर्डी येथेही त्याची मोठ्या प्रमाणात जमीन असल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. एकूणच जवळपास 200 कोटी रुपयांची संपत्ती त्याने उभी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेची चौकशी

दरम्यान, पोलिसांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील त्याच्या फार्महाऊसवर रात्री उशिरा छापा टाकत सखोल तपासणी केली. याच भागातील इशान्येश्वर मंदिर आणि कुटीयामध्येही पोलिसांनी पाहणी केली आहे. या फार्महाऊसवर अनेक राजकीय नेते आणि कलाकारांची ये-जा असायची अशी देखील माहिती समोर येत आहे.

या प्रकरणात अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर महिलेच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत. या पार्श्वभूमीवर त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेची चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे.

TV9 च्या टीमसोबत गैरवर्तन

दरम्यान, या कारवाईदरम्यान आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरातच्या बंगल्याबाहेर वार्तांकनासाठी गेलेल्या TV9 च्या टीमसोबत गैरवर्तन झाल्याची घटना घडली. घरातील काही व्यक्तींनी कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रुपाली चाकणकर यांचा फोटो व्हायरल

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरल्याचा दिसत आहे. अशातच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातचे पाद्यपूजन करताना दिसत आहेत. या फोटोमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रतिक्रिया येत आहेत.

Follow Us