राज्यात कुठे-कुठे नगरपरिषदेच्या निवडणुकींना स्थगिती? वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यातील काही नगरपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. यामध्ये अनेक जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा समावेश आहे.

राज्यात कुठे-कुठे नगरपरिषदेच्या निवडणुकींना स्थगिती? वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 30, 2025 | 8:54 PM

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र राज्यातील काही ठिकाणी संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक तर काही ठिकाणी एक -दोन प्रभागांमधील निवडणूक वेगवेगळ्या कारणांमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. यामध्ये यवतमाळ, जळगाव, बीड अशा अनेक जिल्ह्यांमधील नगर परिषदेच्या निवडणुकांचा समावेश आहे. या निवडणुका आता पुढे ढकलण्यात आल्यानं या नगर परिषदांसाठी आता निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या सुधारीत तारखेला मतदान होणार आहे.

यवतमाळमध्ये स्थगिती

यवतमाळ नगर परिषदेसाठीचं मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे, आता निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार या नगर परिषदेसाठी येत्या वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश काढण्यात आले आहेत.  स्थगित केलेल्या जागांमध्ये जर अध्यक्षपदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्याचे आयोगाचे आदेश आहेत. त्यानुसार  यवतमाळ येथील संपूर्ण निवडणूक स्थगित होऊन आता सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. दरम्यान यवतमाळ नगर परिषदेसोबतच  वणी नगरपरिषदेचा प्रभाग १४ (क)  दिग्रस नगरपरिषदेचा प्रभाग क्र. २ (ब), ५ (ब) आणि १० (ब) पांढरकवडा नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ८ (अ) आणि ११ (ब) या ठिकाणी देखील वीस तारखेला मतदान होणार आहे.

जळगावमध्येही स्थगिती 

जळगाव जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांमधल्या नगरपरिषदांमधील एकूण 12 प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, यामध्ये भुसावळ, पाचोरा, अमळनेर, वरणगाव, यावल आणि सावदा या सहा तालुक्यांमधील एकूण 12 प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  अमळनेर येथील 1, सावदा येथील 3 , भुसावळ येथील 3, यावल येथील एक तर वरणगाव, आणि पाचोरा येथील नगर परिषदेचे प्रत्येकी 2 प्रभाग अशा एकूण 12 प्रभागांच्या निवडणुका पुढे  ढकलण्यात आल्या आहेत.

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत संभ्रम 

दरम्यान अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक होणार की नाही याबाबत संभ्रम अद्यापही कायम आहे. निवडणुकीबाबतचा चेंडू पुन्हा एकदा आयोगाच्या कोर्टात टोलावण्यात  आला आहे. ज्या अपिलाचा वाद होता त्याबाबतचा अहवाल सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाकडे पाठवला असून त्यावर पुढील आदेश मिळाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी उमाकांत गायकवाड आणि तहसीलदार अमित पुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

वाशिम नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर 

वाशिम नगर परिषदेची आणि रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5 ब आणि प्रभाग 10 अ या नगर सेवकपदांच्या जागांसंदर्भात न्यायालयात आक्षेप दाखल झाले होते. त्याचा निकाल 23 नोव्हेंबर नंतर लागल्यानं वाशिम नगर परिषदेसह रिसोड नगर परिषेदेच्या नगरसेवकांच्या दोन जागांसाठी निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे. यासोबत अजूनही काही नगर परिषदेच्या निवडणुकींना स्थगिती देण्यात आली आहे.