Supriya Sule : विशेष सत्र बोलवण्याच्या पत्रावर शरद पवार पक्षाची सही का नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

Supriya Sule : 'भारताच्या व्यापक हिताचा मुद्दा आहे. त्यामुळे देश आधी येतो. त्यानंतर राज्य, पक्ष आणि कुटुंब' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "देश आधी येतो. आम्ही कुठल्याही दहशतवादी हल्ल्याविरोधात एकजूट आहोत, हाच भारताकडून जगाला संदेश गेला पाहिजे. एका जिवंत लोकशाहीत प्रत्येक मुद्यावर चर्चा झाली पाहिजे. पण त्यासाठी योग्य वेळ असली पाहिजे" असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule : विशेष सत्र बोलवण्याच्या पत्रावर शरद पवार पक्षाची सही का नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
Supriya Sule
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2025 | 8:52 AM

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर घेरल्यानंतर सुप्रिया सुळे आता भारतात आल्या आहेत. इथे आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या विशेष सत्राच्या मागणीवर मोठा खुलासा केला आहे. शरद पवार गटाच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या मंचावरुन सरकारकडे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. पण पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विशेष सत्राची मागणी करणं योग्य नाही” देश एकजूट असल्याचा संदेश जाणं आवश्यक आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसंबंधी काँग्रेसने त्यांच्याशी संपर्क साधलेला. पण विद्यमान परिस्थिती लक्षात घेऊन यावर नंतर चर्चा करण्याचा सल्ला दिला. पावसाळी अधिवेनात सरकारला जरुर प्रश्न विचारले जातील, हे त्यांनी स्पष्ट केलं.

“प्रतिनिधीमंडळाची एक सदस्य म्हणून मी परदेशात असताना काँग्रेसने माझ्याशी संपर्क साधलेला. मी त्यांना सांगितलं की, मी बाहेर आहे, त्यामुळे सोबत येऊ शकत नाही. जो पर्यंत सर्व प्रतिनिधीमंडळ परत येत नाही, तो पर्यंत प्रतिक्षा करावी. मी त्यांना म्हटलं की, मी परत आल्यावर निर्णय घेऊ. पण मी परत येण्याआधीच हे झालं. म्हणून मी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी करु शकली नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

किती पक्षांनी लिहिलेलं पत्र

या आठवड्याच्या सुरुवातीला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 16 विरोधी पक्षांनी मोदींना पत्र लिहून विशेष सत्र बोलवण्याची मागणी केली होती. त्यात म्हटलेलं की, “दहशतवादी हल्ला, पूँछ, उरी आणि राजौरीमध्ये नागरिकांची हत्या, युद्धविरामाची घोषणा, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणावरील प्रभाव हे देशासमोरील गंभीर प्रश्न आहेत”

शरद पवार गटाची या पत्रावर स्वाक्षरी का नाही?

भारताच्या भूमिकेबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायासोबत चर्चा करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांच आम्ही समर्थन केलय असं विरोधी पक्षाने पत्रात म्हटलं होतं. सरकारने दुसरे देश आणि मीडियाला माहिती दिलीय. पण संसदेला माहिती दिलेली नाही. भारतीय जनता आणि त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवलं असं या पत्रात लिहिलेलं. शरद पवार पक्षाची या पत्रावर स्वाक्षरी नाही. या बद्दल सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, “हेच कारण आहे. तुम्हाला तथ्यात्मक स्थिती समजून घ्यावी लागेल. मी बाहेर होती. शरद पवार साहेबांनी आधीच स्पष्ट केलेलं, हे ऑपरेशन पूर्ण होत नाही, तो पर्यंत एनसीपी सरकारसोबत उभी राहिलं. आम्ही सरकारविरुद्ध एक शब्दही बोलणार नाही. ही तुच्छ राजकारणाची वेळ नाही”