आता तुकाराम मुंढे करणार चित्रपटाच्या सेटवरील अन्नपदार्थांची तपासणी? FWICE कडून तक्रार
मोठी बातमी समोर येत आहे, 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज'कडून मुंबईमध्ये फिल्म, टेलिव्हिजन आणि डिजिटल प्रोजेक्ट्सच्या सेटवर शुटिंगवेळी काम करणारे कर्मचारी, तंत्रज्ञ, तसेच कलाकार यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर आक्षेप घेण्यात आला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडून (FWICE) मुंबईमध्ये फिल्म, टेलिव्हिजन आणि डिजिटल प्रोजेक्ट्सच्या सेटवर शुटिंगवेळी काम करणारे कर्मचारी, तंत्रज्ञ, तसेच कलाकार यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’च्या वतीने या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना एक पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे. चित्रिकरणाच्या काळात कलाकारांना जे जेवणं दिलं जातं, त्या जेवणाची तसेच जिथे हे अन्न पदार्थ तयार केले जातात त्या लोकेशनची अचानक तपासणी करण्यात यावी अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये फिल्म, टेलिव्हिजन आणि डिजिटल प्रोजेक्ट्सच्या सेटवर शुटिंगवेळी काम करणारे कर्मचारी, तंत्रज्ञ, तसेच कलाकार यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत. या लोकांना शिळं, पोषण तत्त्वाचा अभाव असलेलं तसेच व्यवस्थित न शिजवता, अर्ध कच्च अन्न दिलं जात आहे. तसेच जिथे हे अन्न-पदार्थ बनवले जातात, तो परिसर देखील अस्वच्छ असतो. कलाकार हे चित्रिकरणामध्ये व्यस्त असतात, अशा परिस्थितीमध्ये अशा अन्नामुळे गंभीर आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
त्यामुळे आता तुकाराम मुंडे यांनी तातडीने आपल्या तक्रारीची दखल घ्यावी, आणि अचानक छापा टाकून अन्नपदार्थांची तपासणी करावी, तसेच जिथे हे अन्नपदार्थ तयार केले जातात, तिथे देखील भेट द्यावी, अशी मागणी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडून करण्यात आली आहे, दरम्यान आता या पत्रानंतर तुकाराम मुंडे काय अॅक्शन घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर राज्यभरात कामाचा धडका लावला आहे, त्यांच्या कामाचं कौतुक होत आहे. त्यांना विविध संस्थाकडून देखील तक्रारी प्राप्त होत आहेत. दरम्यान आता ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’च्या वतीने तक्रार करण्यात आली आहे.