
नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. येवला म्हटलं की पैठणी साडी डोळ्यांसमोर येते. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात माळी, विणकरी, मराठी, वंजारी या समाजाचंही प्राबल्य दिसून येतं. कांद्याची मोठी बाजारपेठ असलेलं लासलगाव, पाटोदा आणि येवला ही महत्त्वाची शहरं या मतदारसंघात येतात. 2008 मध्ये केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड तालुक्यातील लासलगाव आणि देवगाव या महसूल मंडळांचा समावेश होतो. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा राजकारणातील प्रवास जरी मुंबईतून सुरू झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते येवला मतदारसंघात राजकीयदृष्ट्या स्थिर झाले. या मतदारसंघावर छगन भुजबळ यांचं वर्चस्व राहिलं आहे. एकेकाळी येवला हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. नंतर तिथे शिवसेनेचंही वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. मात्र 2004 मध्ये छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर येवला हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण झाली. आता भुजबळांकडे मंत्रीपद, निधी, अजित दादा आणि घड्याळ्याचं चिन्हसुद्धा आहे, तरीही येवला मतदारसंघ त्यांच्यासाठी विविध कारणांमुळे आव्हानात्मक ठरणार...