
आज शिवसेना ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सुधाकर बडगुजर यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतानाच ही भेट झाली होती, या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली, आज पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
सुधाकर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला आहे, सीमा हिरे यांनी त्यांच्याविरोधात दोनदा निवडणूक लढवली आहे. सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. बडगुजर यांच्यावर 17 गुन्हे दाखल असल्याचा दावा त्यांनी केला आहे. बडगुजर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला सीमा हिरे यांनी विरोध केल्यामुळे आता बडगुजर यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना सोडून आमच्या पक्षात सहभागी झाले. शिवसैनिकांना न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे करतात, हा ओढा भविष्यात वाढणार आहे, चांगले कार्यकर्ते शिवसेने सोबत जोडले जात आहेत त्यांचं स्वागत. भविष्य त्यांना चांगली संधी उपलब्ध करून देऊ. त्यांच्या माध्यमातून शिवसेना मजबूत होईल. सगळ्याच लोकांची हकालपट्टी त्यांना करावी लागणार आहे. त्यांच्यासोबत कोणी थांबायला तयार नाही. त्यांची नेहमीच कार्यकर्त्याांना दाबण्याची रणनीती आहे, त्यामुळे त्यांना सगळेच सोडून जात आहेत, असं कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान महायुतीमध्ये कोणीही नाराज नसून, तिन्ही नेते मिळून राज्याचा गाडा व्यवस्थित हाकत आहेत, असंही यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.