इरशाळवाडीत ट्रेकिंगसाठी गेला पण परतलाच नाही..; डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे?

इरशाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या डोंबिवलीतल्या एका वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी हा तरुण मित्रांसोबत ट्रेकिंगला गेला होता. ट्रेक करताना अचानक त्याला चक्कर आली.

इरशाळवाडीत ट्रेकिंगसाठी गेला पण परतलाच नाही..; डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे?
डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे?
Image Credit source: Tv9
| Updated on: May 13, 2026 | 12:02 PM

उन्हाची तीव्रता, डोंगर चढाईचा थरार आणि मित्रांसोबतचा ट्रेक… पण या आनंदाच्या क्षणांवर काळाने अचानक झडप घातली. खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी इथं ट्रेकिंगसाठी गेलेल्या डोंबिवलीतील 20 वर्षीय तरुणाचा ट्रेंकिंगदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रितेश कोणका असं या तरुणाचं नाव असून या घटनेमुळे डोंबिवलीत हळहळ व्यक्त केली जात आहे. रितेश पश्चिम डोंबिवलीतील कोपर परिसरात राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हा आपल्या गिर्यारोहक मित्रांसोबत रविवारी 11 मे रोजी इरशाळवाडी इथं ट्रेकिंगसाठी गेला होता. चढाई सुरू असताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

रितेशच्या मित्रांनी तात्काळ त्याला पाणी पाजून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. तसंच स्थानिक ग्रामस्थ आणि इतर गिर्यारोहकांच्या मदतीने त्याला डोंगरावरून खाली आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पवार आणि प्रभारी पोलिस विशाल पवार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खाली आणत उत्तरीय तपासणीसाठी खालापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार उष्माघात किंवा हृदयविकाराचा झटका हे मृत्यूमागील कारण असू शकतं. मात्र, उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

उष्णतेची लाट

सध्या राज्यात उष्णतेची लाट सुरू असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना गिर्यारोहण करताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ट्रेकिंगला जाताना पुरेसं पाणी, ग्लुकोज आणि प्राथमिक उपचार साहित्य सोबत ठेवावं, तसंच दुपारी 12 ते 4 या वेळेत गिर्यारोहण टाळावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. रितेशच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवार आणि महाविद्यालयीन परिसरातही शोककळा पसरली आहे.

“सध्या राज्यभरात उन्हाचा कडाका असून या वाढत्या तापमानात आपण शक्यतो सह्याद्रीत गिर्यारोहण करणं किंवा फिरणं टाळलं पाहिजे. अनुभवी मंडळींनाही या उन्हात त्रास होतो. त्यामुळे नवख्या मंडळींनी या गोष्टीची विशेष काळजी घ्यायला हवी. सह्याद्रीत ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर रात्रीच्या वेळीही ट्रेकिंग केली जाते. अनुभवी मंडळींसोबतच हा ट्रेक करावा आणि सोबत मुबलक प्रमाणात पाणी, खाऊ, प्रथमोपचाराचं साहित्य ठेवावं. आपल्या शरीराच्या क्षमतेनुसारच ट्रेक करावा,” असा सल्ला गिर्यारोहक भूषण पवार यांनी दिला आहे.

Follow Us