
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. आता विचार करण्याचा काळ संपला सरकारने थेट निर्णय घेतला पाहिजे, असेही मत जनता तसेच काही राजकीय पक्षाचे नेते व्यक्त करत आहेत. असे असतानाच राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी वाढल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्त्वात दिल्लीत उच्चपदस्थांसोबत बैठका चालू आहेत. सोबतच सीमेवर तिन्ही सैन्यदलं सज्ज झाली आहेत. त्यामुळेच आता युद्धाचे काळे ढग जमा झाले आहेत का? असा प्रश्न सगळीकडे विचारला जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीलमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला परदेश दौरा अर्धवट सोडून थेट भारतात परतले आहेत. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तसेच अन्य उच्चपदस्थ अधिकारी यांच्या उपस्थितीत अनेक बैठका पार पडल्या आहेत. पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने मोठे पाच निर्णय घेतले आहेत. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही भारताविरोधात मोठी पावलं उचलली आहेत. त्यामुळे आता या दोन्ही देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे. असे असतानाच अमित शाहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही एक बैठक घेतली आहे. त्यामुळेच आता काहीतरी मोठे घडणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारताची तिन्ही सैन्यदले हाय अलर्टवर आहेत. भारतीय नौदल, भूदल, वायूदलाने युद्धाभ्यास चालू केला आहे. वायूदलातर्फे अरबी समुद्रात युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. सोबतच पाकिस्तानी हद्दीत काय घडत आहे, यासाठी भूदलाची काही विमानंही आकाशात घिरट्या घालत आहेत. दुसरीकडे भूदलाने राजस्थानमध्ये ठिकठिकाणी युद्धाभ्यास केला आहे. वायूदलानेही सराव चालू केला आहे. वायूदलाने आपली लढाऊ विमाने सज्ज ठेवली आहेत. त्यामुळे आता एकीकडे दिल्लीत वाढत्या घडामोडी आणि दुसरीकडे सैन्यदलाची सज्जता पहता आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.