
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून लोक कारवाईची मागणी करत आहेत. म्हणून सैन्याला सुद्धा फ्री हँड देण्यात आलाय. या दरम्यान काँग्रेस नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी सर्जिकल स्ट्राइकबद्दल मोठा दावा केला आहे. “सर्जिकल स्ट्राइक झालाच नव्हता. मी आधीपासून म्हणतोय आणि आत्ताही तेच म्हणतो, पुरावे कुठे आहेत?” “आपल्या देशात बॉम्ब येऊन पडला, समजणार नाही का?. असं बोलतात पाकिस्तानात आपण सर्जिकल स्ट्राइक केला होता. काही झालं नाही, कुठे दिसले नाही सर्जिकल स्ट्राइक. कोणाला समजलं नाही” अशी वक्तव्य चरणजीत सिंह चन्नी यांनी केली आहेत. काँग्रेस कार्यसमितीच्या (CWC) बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चन्नी यांनी हे वक्तव्य केलं. “पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 10 दिवस झाले, तरी सरकारने अजून कुठलीही कारवाई केलेली नाही” असं ते म्हणाले. “पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करणं आणि सिंधू जल करार स्थगित करण्यासारख्या निर्णयांना काही अर्थ नाही” असं चन्नी यांचं म्हणणं आहे.
“पुलवामा हल्ल्यात 40 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला. निवडणुका झाल्या, त्यावेळी सरकारने कारवाईचा दावा केला” असं चन्नी म्हणाले. ते म्हणाले की, “स्ट्राइक कुठे झाले हे आजपर्यंत मला समजलेलं नाही. त्यावेळी कुठे दहशतवादी मारले गेले? असं म्हणतात, पाकिस्तानात स्ट्राइक झालेला. आपल्या देशात बॉम्ब पडला तर समजणार नाही का?” “असं म्हणतात, पाकिस्तानात आपण सर्जिकल स्ट्राइक केला. काही झालं नाही, कुठे दिसले नाहीत सर्जिकल स्ट्राइक. कोणाला समजलं नाही” अशी धक्कादायक वक्तव्य चन्नी यांनी केली.
‘तुम्हाला पुरावे हवे आहेत का?’
सर्जिकल स्ट्राइकच्या पुराव्याची तुम्ही मागणी करताय का? त्यावर चन्नी यांनी ‘मी सुरुवातीपासून ही मागणी करतोय’ असं सांगितलं. “आपल्या देशातील लोकांच्या जखमांवर मलम लावण्याची ही वेळ आहे. केंद्राने काहीतरी करावं, ही आमची मागणी आहे. पहलगामच्या हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी” अशी मागणी चन्नी यांनी केली.
भाजपने काय प्रत्युत्तर दिलं?
चरणजीत सिंह चन्नी यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. दिल्ली सरकारमधील मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी चन्नी यांच्यावर जोरदार टीका केली. “काँग्रेसने पुन्हा एकदा सैन्य आणि हवाई दलावर प्रश्न निर्माण केलेत. चरणजीत सिंह चन्नी यांना, सर्जिकल स्ट्राइक झालेले यावर त्यांना विश्वास नाहीय. त्यांना पुरावे हवे आहेत. काँग्रेस आणि गांधी कुटुंबाची कशी मानसिकता आहे, ते वारंवार सैन्य आणि हवाई दलावर खोटं बोलण्याचा आरोप करतात. पाकिस्तान स्वत: ही गोष्ट मान्य करतोय की, सर्जिकल स्ट्राइक झालेले. चन्नी यांना पुरावे हवे असतील, तर त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पाकिस्तानात जाऊन कुठे सर्जिकल स्ट्राइक झालेले ते पाहून यावं” अशा शब्दात मनजिंदर सिंह सिरसा यांनी प्रत्युत्तर दिलं.