क्राऊन प्रिन्स-मोदींमधील चर्चेनंतर बारसू रिफायनरीबद्दल शिवसेना खासदाराच महत्त्वाच वक्तव्य

| Updated on: Sep 12, 2023 | 12:59 PM

Barsu Refinery : बारसू रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे. त्यावर आता शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काय म्हटलय? अजित पवार यांनी ऊर्जा खात्याची बैठक घेतली, त्या बद्दलही प्रश्न विचारण्यात आला.

क्राऊन प्रिन्स-मोदींमधील चर्चेनंतर बारसू रिफायनरीबद्दल शिवसेना खासदाराच महत्त्वाच वक्तव्य
Follow us on

नवी दिल्ली : G20 परिषद संपल्यानंतर सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स भारतातच थांबले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. यात बारसू रिफायनरीचा मुद्दा होता. 100 बिझनेसमन आणि 7 मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह सौदीचे क्राऊन प्रिन्स भारतात आले होते. बारसू रिफायनरीबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्या बद्दल शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारण्यात आला. “महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून महत्वाची गोष्ट आहे. सामंजस्य करारामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रिफायनकरी प्रकल्प मार्गी लागेल. बारसू महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्राचा जीडीपी यामुळे वाढू शकतो. कोकणातल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. हा ग्रीन प्रोजेक्ट आहे. पर्यावरणाच्या दुष्टीने सर्व उपायोजना यामध्ये असतील. सामंजस्य करारामुळे हा प्रकल्प मार्गी लागेल अशी अपेक्षा बाळगतो” असं राहुल शेवाळे म्हणाले.

“बारसूला असणाऱ्या विरोधासंबंधी राज्य सरकार आणि मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. बारसू प्रकल्पाबद्दलचे गैरसमज दूर करण्यात येतील. पर्यावरण दृष्टीकोनातून अवलंब करण्यात येईल. बारसू आणि रत्नागिरीतील नागरिकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्यात येईल” असं राहुल शेवाळे म्हणाले. ऊर्जा खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पण या विभागाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यावरुन उलट-सुलट राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यासंबंधी राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारण्यात आला. “विरोधकांकडून वातावरण निर्मिती केली जात आहे. बैठक घेतली हा शासकीय कामकाजाचा विषय आहे. त्यात विनाकारण राजकारण आणू नये” असं उत्तर राहुल शेवाळे यांनी दिलं.

‘त्यामुळे खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत’

“महायुतीमधील तिन्ही पक्ष सामंजस्याने काम करत आहेत. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काम सुरु आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कामाच्या धडाक्याने विरोधकांच्या मनात धास्ती निर्माण झालीय त्यामुळे खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत” असं राहुल शेवाळे म्हणाले.