
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या दरम्यान दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगात कार्यरत एक कर्मचारी केक घेऊन आत जाताना दिसला. माध्यमांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने उत्तर देण्यास नकार दिला. हा केक नेमका कोणता आनंद साजरा करण्यासाठी घेऊन जात आहेत असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. मात्र, त्याने यावर मौन बाळगले.
पाकिस्तान दूतावासात केक नेण्याबाबत अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. असेही म्हटले जात आहे की पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान खूश आहे. सत्य काहीही असले तरी पाकिस्तानी कर्मचाऱ्याने उत्तर देण्याचे टाळल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पाकिस्तानी उच्चायोगाबाहेरील सुरक्षा हटवली
भारत-पाकिस्तान संबंधांचा परिणाम दिसू लागला आहे. दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. सध्या पाकिस्तानी दूतावासाबाहेर शांतता पसरली आहे. कोणताही सुरक्षारक्षक दिसत नाही.
इधर दिल्ली के पाकिस्तान उच्चायोग में केक मंगवाए जा रहे हैं!! pic.twitter.com/BS4x5ihaRS
— Ankit Kumar Avasthi (@kaankit) April 24, 2025
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सायंकाळी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची (सीसीएस) तातडीची बैठक बोलावण्यात आली, ज्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीत असं सांगण्यात आलं की या हल्ल्यामागे सीमेपलीकडील कट रचले गेले आहेत. हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा केंद्रशासित प्रदेशात यशस्वीपणे निवडणुका पार पडल्या होत्या आणि क्षेत्र आर्थिक विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हल्ल्याची गंभीरता लक्षात घेऊन सीसीएसने अनेक कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला.
पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडावं लागेल
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत (एसव्हीईएस) पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना यापूर्वी जारी केलेले कोणतेही एसव्हीईएस व्हिसा रद्द समजले जातील. एसव्हीईएस व्हिसाअंतर्गत भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडावा लागेल.
दरम्यान, नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगातील संरक्षण, नौदल आणि वायुसेना सल्लागारांना ‘अवांछित व्यक्ती’ घोषित करण्यात आलं आहे. त्यांना एका आठवड्याच्या आत भारत सोडावा लागेल. त्याचप्रमाणे भारतही इस्लामाबादमधील आपले लष्करी सल्लागार आणि पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांना परत बोलवेल. दोन्ही देशांच्या उच्चायोगातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरून 30 करण्यात येईल, जी 1 मे पर्यंत लागू होईल.