
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे बनले आहेत. तर दुसरीकडे मात्र अमेरिका आणि भारतामधील संबंध दुरावत असतानाच आता जागतिक पटलावर एक नवं समिकरण उदयाला येण्याची शक्यता आहे. भारत, चीन आणि रशिया यांच्यामधील जवळीक वाढताना दिसत आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे, त्यांच्या नव्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले ट्रम्प?
अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे तणाव निर्माण झालेला असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भारत, चीन आणि रशिया संदर्भात एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आम्हाला आता असं वाटत आहे की, चीनमुळे भारत आणि रशियाला आम्ही गमावलं आहे, आशा आहे की, त्यांची ही मैत्री दीर्घकाळ टीकेल, आणि एक समृद्ध भविष्य घेऊन येईल, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टसोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि पुतिन यांचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.
भारताची प्रतिक्रिया
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या पोस्टनंतर आता भारताची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे, ट्रम्प यांच्या पोस्टवर आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अमेरिकेनं भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावलं आहे, त्यामुळे अमेरिका आणि भारतामध्ये सध्या तणाव पाहायला मिळत आहे, दुसरीकडे नुकतीच चीनमध्ये एससीओ ची बैठक पार पडली, या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन सहभागी झाले होते. त्यानंतर तीन सप्टेंबर रोजी चीनमध्ये सैन्य परेड झाली या परेडला पुतिन यांची उपस्थिती होती, या सर्व पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातं आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरनानंतर आता भारत, चीन आणि रशिया यांच्यामधील जवळीक वाढत आहे.