
गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी १२ जून २०२५ रोजी विमानाचा मोठा अपघात झाला. एअर इंडियाचे बोईंग ७८७ हे ड्रीमलायनर विमान टेकऑफ घेतल्यानंतर काही सेकंदातच कोसळले. लंडनला जाण्यासाठी निघालेले हे विमान कोसळल्याने आतापर्यंत २६५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबद्दल विविध अपडेट आता समोर येत आहेत.
याप्रकरणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी आणि विमानाभोवतीचे तापमान सुमारे १,००० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. यामुळे बचावकार्य करणे अत्यंत कठीण झाले. अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “विमानाची धडक होताच इंधनाची टाकी फुटली. यानंतर तात्काळ आग लागली. ज्यामुळे काही क्षणातच तापमान १ हजार अंश सेल्सिअसवर पोहोचले. हे तापमान इतके जास्त होते की कोणालाही वाचण्याची संधी मिळाली नाही.”
एसडीआरएफच्या एका अधिकाऱ्याने तर दावा केला की, “या अपघातानंतर तापमान इतके वाढले होते की घटनास्थळावरील कुत्रे, मांजर आणि इतर पक्षी याचे बळी पडले. त्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.”
दरम्यान या विमान अपघाताची चौकशी विमान दुर्घटना तपास ब्युरो (AAIB) सह अमेरिका आणि ब्रिटनच्या पथकांकडून आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार केली जात आहे. इंजिन फेलियर, विमानाचे अधिक वजन किंवा थ्रस्ट न मिळणे यांसारख्या अनेक शक्यतांवर तपास सुरू आहे. या भीषण अपघाताबद्दल जगभरातील देशांनी दुःख व्यक्त केले आहे. आज, शुक्रवार सकाळी सुमारे ८ वाजून ३० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांनी दुर्घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.
एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच प्रवाशांमध्ये ११ लहानमुलं आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता यातील 241 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.