625 फूट उंचावर उडालं, त्यानंतर अवघ्या एका मिनिटातच… अहमदाबाद विमान दुर्घटनेचा धक्कादायक Video समोर

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतरच मेघानीनगर येथे कोसळले. या भीषण अपघातात २४२ प्रवासी आणि क्रू सदस्य होते. एका नवीन व्हिडिओमध्ये विमानाचे खाली कोसळणे आणि स्फोट स्पष्ट दिसत आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलला 'मेडे' कॉल मिळाला होता, परंतु त्यानंतर प्रतिसाद नाही. सध्या बचावकार्य सुरू आहे.

625 फूट उंचावर उडालं, त्यानंतर अवघ्या एका मिनिटातच... अहमदाबाद विमान दुर्घटनेचा धक्कादायक Video समोर
Ahmedabad Air India Plane Crash 23
| Updated on: Jun 12, 2025 | 3:53 PM

अहमदाबादवरुन लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी कोसळलं. यामुळे विमानाला आग लागली. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. आता नुकतंच या विमानाचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत हे विमान कसाप्रकारे खाली कोसळलं आणि त्याचा कसा स्फोट झाला, हे स्पष्ट पाहायला मिळत आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI171 या विमानाने 12 जून रोजी दुपारी 1 वाजून 39 मिनिटांनी (IST) अहमदाबादहून उड्डाण घेतले. एडीएस-बी (ADS-B) डेटानुसार, या विमानाने 625 फूट बॅरोमेट्रिक उंची गाठली होती. त्यावेळी त्याची गती 174 नॉट्स (KTS) होती. मात्र, यानंतर काही क्षणांतच विमान 475 फूट प्रति मिनिट वेगाने खाली उतरु लागले. या व्हिडीओमध्ये विमान किती वेगाने जमिनीकडे येत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. हे विमान खाली येताच मोठा स्फोट झाला आणि ते विमान कोसळले.

एटीसीच्या (ATC) माहितीनुसार, विमानाने रनवे 23 वरून टेकऑफ केले. त्यानंतर त्यांनी ‘मेडे’ कॉल (Mayday Call) दिला, परंतु त्यानंतर एटीसीने केलेल्या कोणत्याही कॉलला विमानाकडून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर अवघ्या काही सेकंदातच विमान खाली कोसळले.

विमानातील प्रवासी आणि क्रू सदस्य

या विमानात 2 पायलट आणि 10 केबिन क्रूसह एकूण 242 लोक प्रवास करत होते. विमानाची कमान कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर यांच्या हाती होती. हे विमान दिल्लीहून अहमदाबादला आले होते. त्यानंतर ते लंडनसाठी रवाना होणार होते. अवघ्या एका मिनिटात घडलेल्या या भीषण अपघातामुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरू आहे.