
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला अणवस्त्रांवरुन सुनावलं आहे. “पाकिस्तान नेहमी, ते अणवस्त्र संपन्न देश असल्याचे सांगतो. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जर ते कुठल्या देशात जाऊन निरपराधांना मारणार असतील, तर कुठलाही देश गप्प बसणार नाही” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. “अशा प्रकारे तुम्ही भारताच्या भूमीवर येऊन हल्ला करता. धर्म विचारुन गोळ्या चालवल्या. तुम्ही कुठल्या दिवसाबद्दल बोलत आहात? तुम्ही तर ISIS सारखं काम केलं आहे” असं त्यांनी पाकिस्तानला सुनावलं. “मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की, काश्मीर आमच अभिन्न अंग आहे, तर तिथले काश्मिरी सुद्धा आमचं अभिन्न अंग आहेत. आपण काश्मिरींवर संशय घेऊ शकत नाही” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन पाकिस्तानवर निशाणा साधताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “वेळेच्या हिशोबाने पाकिस्तान भारतापेक्षा अर्धातास मागे आहे. पण तसं पहायला गेलं तर पाकिस्तान भारतापेक्षा 50 वर्षांनी मागे आहे”
पाकिस्तानी नेत्यांच्या धमकीची खिल्ली उडवली
वक्फ संशोधन विधेयकाला विरोध करण्यासाठी रविवारी असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्रात एका सार्वजनिक बैठकीला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. हैदराबादचे खासदार असणारे ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पाकिस्तानी नेत्यांच्या धमकीची खिल्ली उडवली. ‘तुमच्या देशाच बजेट, आमच्या देशाच्या सैन्य बजेटच्या आसपासही नाही’ असं ओवैसी म्हणाले.
‘बत्ती गुल’ कार्यक्रमात सहभागी व्हा
पाकिस्तानला आर्थिक दृष्टया कमजोर करण्यासाठी पंतप्रधानांनी पावलं उचलावीत अशी मागणी ओवैसी यांनी केली. वक्फ सुधारणा विधेयकावर ओवैसीनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून (एआयएमपीएलबी) आयोजित होणाऱ्या विरोध कार्यक्रमात सहभागी होण्याच आवाहन केलं. त्यांनी 30 एप्रिलला लाइट बंद करुन ‘बत्ती गुल’ कार्यक्रमात सहभागी होण्याच आवाहन केलं.
अजित पवारांवर साधला निशाणा
वक्फ संशोधन विधेयकाच समर्थन केल्याबद्दल ओवैसीनी अजित पवार, नितीश कुमार, जयंत चौधरी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर निशाणा साधला. मुस्लिम आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेचे लोक त्यांना माफ करणार नाहीत, असं ते म्हणाले.