Air India Express : केबिन क्रू ला एअर इंडियाचा दणका, एकाचवेळी किती जणांना नोकरीवरुन काढलं?

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक केबिन क्रू सदस्य सामूहिक रजेवर गेले आहेत. कर्मचाऱ्यांनी बंड पुकारल्यामुळे एअर इंडियावर उड्डाण रद्द करण्याची वेळ आली आहे.

Air India Express : केबिन क्रू ला एअर इंडियाचा दणका, एकाचवेळी किती जणांना नोकरीवरुन काढलं?
Air India (file photo)
| Updated on: May 09, 2024 | 9:23 AM

केबिन क्रू चे सदस्य एकाचवेळी रजेवर गेल्याने एअर इंडिया एक्सप्रेसची मोठी पंचाईत झाली आहे. एअर इंडियाला कालही काही उड्डाण रद्द करावी लागली होती. आज गुरुवारी सुद्धा एअर इंडिया एक्सप्रेसची 70 पेक्षा जास्त विमान रद्द झाली आहेत किंवा उशिराने उड्डाण सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. कर्मचाऱ्यांनी बंड पुकारल्यामुळे एअर इंडियावर उड्डाण रद्द करण्याची वेळ आली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने अखेर केबिन क्रू च्या 25 सदस्यांना बर्खास्त केलं आहे. नियमांचा हवाला देऊन एअर इंडियाने ही कारवाई केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलय, त्यात सीक लीववर गेलेले कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांच्या या बंडखोरीचा त्रास प्रवाशांना भोगावा लागतोय.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जी विमानं गुरुवारी रद्द करण्यात आली आहेत, त्यात चेन्नई-कोलकाता, चेन्नई-सिंगापूर आणि त्रिचे-सिंगापूर ही विमानं आहेत. लखनऊ ते बंगळुरु फ्लाईटला उशीर होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये काम करणारे 300 पेक्षा जास्त कर्मचारी बुधवारी कामावर आले नाहीत. या सर्व कर्मचाऱ्यांनीआधी एकत्र सीक लीवसाठी अर्ज केला. मोबाइल फोन ऑफ केला. त्यामुळे बुधवारी विमानांच्या ऑपरेशन्समध्ये एअर इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

बंडखोरीमागे काय कारण?

नोकरीच्या नवीन अटी हे कर्मचाऱ्यांच्या बंडखोरीमागे कारण आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा नवीन अटींना विरोध आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितलं की, “आमच्या केबिन क्रू चे अनेक सदस्य मंगळवारी रात्री ड्युटीवर येण्याआधी आजारी पडले. यामुळे अनेक विमानं रद्द करावी लागली किंवा काही उशिराने उड्डाण सुरु होती”

कर्मचारी संघटनेचा आरोप काय?

एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांनी बंडखोरी करण्याची ही पहिली वेळ नाहीय. “एअर इंडिया व्यवस्थापन व्यवस्थित काम करत नाहीय. कर्मचाऱ्यांसोबतच्या व्यवहारात समानता नाहीय” असं एअर इंडिया एक्सप्रेस केबिन क्रू वर्गाच प्रतिनिधीत्व करणाऱ्य़ा एका संघाने आरोप केला होता. ‘मॅनेजमेंट व्यवस्थित होत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम झालाय’ असं नोंदणीकृत युनियन एअर इंडिया एक्सप्रेस कर्मचारी संघटनेने आरोप केला होता.