दिवाळी संपताच महागाईचा झटका! अमूलचे दूध दोन ते चार रुपयांनी महागले; आजपासून दरवाढ लागू
Amul Milk Prices Hike: मदर डेअरी पाठोपाठ आता अमूलच्या दुधाच्या दरात प्रति लिटर दोन ते चार रुपयांची वाढ करण्यात आली असून, नवीन दर आजपासून, 12 नोव्हेंबर पासून लागू झाले आहेत.

दिल्ली एनसीआर (NCR) क्षेत्रातील दुधाचा सर्वात मोठा सप्लायर ‘मदर डेअरी’ने ११ नोव्हेंबर रोजी दरवाढ जाहीर केली होती. त्यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर दोन ते चार रुपयांची वाढ केली जी आजपासून लागू झाली आहे. आता याच पाठोपाठ अमूलनेही दरवाढ जाहीर केली आहे. बुधवारी जारी केलेल्या एका निवेदनात, ‘अमूल’ ब्रँडअंतर्गत दुधाची विक्री करणाऱ्या ‘गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन’ने (GCMMF) दुधाच्या दरात प्रति लिटर २ ते ४ रुपयांची वाढ केल्याची घोषणा केली. ही दरवाढ मदर डेअरी प्रमाणेच गुरुवारपासून लागू होईल.
का घेतला हा निर्णय?
अमूल आणि मदर डेअरी यांसारख्या प्रमुख दुग्ध उत्पादक कंपन्यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर दोन ते चार रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ गुरुवारपासून लागू होईल. शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याचा वाढता खर्च आणि इंधनाच्या दरातील वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एका निवेदनात मदर डेअरीने स्पष्ट केले आहे की, उत्पादन खर्च आणि परिचालन खर्चात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे दुधाच्या किमतीत हा बदल करणे आवश्यक झाले होते.
अमूलचे कोणते दूध किती रुपयांनी महागले?
GCMMF ने सांगितले आहे की, त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘अमूल ताजा’ (Amul Taaza) टोनड दुधाच्या किमतीत प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर ‘अमूल गोल्ड’ (Amul Gold) दुधाच्या किमतीत प्रति लिटर चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मदर डेअरीचा दुधात किती रुपयांची वाढ?
दिल्ली एनसीआर (NCR) मध्ये दुधाच्या किमती वाढल्या आहेत. एनसीआरमध्ये मदर डेअरीच्या टोनड दुधाची किंमत प्रति लिटर ५८ रुपयांवरून ६० रुपये झाली आहे. फुल-क्रीम दुधाची किंमत आता प्रति लिटर ७२ रुपयांवरून वाढून ७६ रुपये झाली आहे. टोनड दुधाची (पॅकेटमधील) किंमत प्रति लिटर ६० रुपयांवरून ६२ रुपये झाली आहे. डबल-टोनड दुधाची किंमत प्रति लिटर ५४ रुपयांवरून ५६ रुपये झाली आहे. गाईच्या दुधाची किंमत प्रति लिटर ६२ रुपयांवरून ६५ रुपये करण्यात आली आहे.
पावसाची परिणाम दुधाच्या किंमतीवर
असे नमूद करण्यात आले की, गुजरात आणि देशातील इतर अनेक भागांत अपुऱ्या व असमान पावसामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीमुळे, आम्हाला दुधाच्या किरकोळ विक्री किमतीत वाढ करणे भाग पडले आहे. विशेष म्हणजे, ‘मदर डेअरी’ एनसीआर (NCR) क्षेत्रात दररोज सुमारे ३५ लाख लिटर दुधाची विक्री करते. ही विक्री त्यांच्या स्वतःच्या दुकानांतून, किरकोळ विक्री केंद्रांतून आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केली जाते.