
“जोश, होश आणि विचारपूर्वक तुम्ही शत्रुची ठिकाणं उद्धवस्त केली. आज मी इथे संरक्षण मंत्री तसच एक मेसेंजर म्हणून आलोय. देशवासियांच्या शुभेच्छा देण्यासाठी आलोय. मी पोस्टमॅन म्हणून इथे आलोय. देशवासियांचा संदेश घेऊन आलो आहे. आम्हाला आमच्या सैन्य दलांचा गर्व आहे. ऑपरेशन सिंदूर फक्त एका ऑपरेशनच नाव नाही. ही आमची कटिबद्धता आहे” असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. “भारताने दाखवून दिलं, आम्ही फक्त बचाव करत नाही, वेळ येते तेव्हा कठोर निर्णय घेऊन कठोर कारवाई करतो. हे ऑपरेशन लष्कराच्या प्रत्येक जवानाच्या डोळ्यातील स्वप्न आहे. शत्रूची छाती चिरुन हे दहशतवादी तळ नष्ट केलेत” असं राजनाथ सिंह म्हणाले.
“ऑपरेशन सिंदूर ही दहशतवादाविरुद्ध भारताने चालवलेली आतापर्यंतची इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे. मागच्या 35-40 वर्षांपासून आपण सीमेपलीकडून सुरु असलेल्या दहशतवादाचा सामना करतोय. आज भारताने जगाला स्पष्ट केलं, दहशतवादाविरोधात आम्ही कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकतो. पहलगाम हल्ल्याद्वारे त्यांनी आपली सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारताच्या माथ्यावर वार केला. आम्ही त्यांच्या छातीवर वार केला. पाकिस्तानच्या जखमांवर उपचार एकच, त्यांनी भारतविरोधी दहशतवादी संघटनांना आश्रय देणं बंद करावं. भारतविरोधी कारवायांसाठी त्यांच्या भूमीचा वापर बंद झाला पाहिजे” असं राजनाथ सिंह म्हणाले.
‘…तर बात दूर तक जायेंगी’
“21 वर्षांपूर्वी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमोर पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये जाहीर केलेलं, त्यांच्या भूमीवरुन दहशतवाद एक्सपोर्ट होणार नाही. पण पाकिस्तानने भारताला धोका दिला. आजही ते धोका देत आहेत. त्यांची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. दहशतवाद सुरु राहिला, तर अशीच त्यांना किंमत चुकवावी लागत राहिलं” असा स्पष्ट इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. “पंतप्रधानांनी स्पष्ट केलय, पुन्हा असा दहशतवादी हल्ला झाला, तर त्याला Act of war मानण्यात येईल. आता भारताविरोधात सीमेपलीकडून कुठलीही कृती होणार नाही, असं ठरलय. पण आता काही केलं, तर बात दूर तक जायेंगी” हे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.