Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर व्यथित झालेल्या मुस्लिम शिक्षकाकडून इस्लाम धर्माचा त्याग, म्हणाला…

Pahalgam Terror Attack : "पहलगाम सारख्या हिंसक घटनांमध्ये धर्माचा चुकीचा वापर केला जातो. एखाद्याला त्याच्या धर्मामुळे मारणं कसं योग्य ठरु शकतं? ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे" असं साबिर हुसैन म्हणाला.

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर व्यथित झालेल्या मुस्लिम शिक्षकाकडून इस्लाम धर्माचा त्याग, म्हणाला...
Sabir Hussian
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 26, 2025 | 11:33 AM

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी जे झालं, ते कधीच कोणी विसरणार नाही. 26 पर्यटकांची दहशतवाद्यांनी निदर्यतेने हत्या केली. अन्य अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. आयुष्यभरासाठी चांगली आठवण सोबत घेऊन जाण्यासाठी ते इथे आले होते. पण दुर्देवाने आयुष्यभरासाठी भळाळती जखम इथून घेऊन गेले. संपूर्ण देशात या घटनेबद्दल संताप, रोष आहे. या हल्ल्यानंतर निराश झालेला पश्चिम बंगालमधील एका मुस्लिम शिक्षक साबिर हुसैनने इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या करण्याआधी ते कुठल्या धर्माचे आहेत ते तपासलं. साबिर हुसैन दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बादुरिया येथील आदर्श विद्यापीठात विज्ञान विषयाचा शिक्षक आहे. साबिर हुसैन म्हणाला की, ‘देशात सध्या धर्माच्या नावावर हिंसक घटना घडतायत. त्यामुळे मी दु:खी आहे’. दहशतवादी हल्ल्यानंतर दु:खी झालेल्या बदुरियाच्या साबिर हुसैनने इस्लाम धर्म सोडण्यासाठी कोर्टाची पायरी चढली आहे.

‘हे आता मी सहन करु शकत नाही’

“हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा चुकीचा उपयोग केला जातो. मी कुठल्या धर्माचा अनादर करत नाही. हा माझा व्यक्तीगत निर्णय आहे. हिंसाचार पसरवण्यासाठी धर्माचा शस्त्रासारखा कसा वापर केला जातो, ते मी पाहिलय. काश्मीरमध्ये असं अनेकदा झालय. हे आता मी सहन करु शकत नाही” असं एका न्यूज चॅनलशी बोलताना साबिर हुसैन म्हणाला.

‘ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली’

“कुठल्या धर्मामुळे नाही, तर मला लोकांनी फक्त एक माणूस म्हणून ओळखावं अशी इच्छा आहे. पहलगाम सारख्या हिंसक घटनांमध्ये धर्माचा चुकीचा वापर केला जातो. एखाद्याला त्याच्या धर्मामुळे मारणं कसं योग्य ठरु शकतं? ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे” असं साबिर हुसैन म्हणाला.

निर्णय फक्त स्वत:पुरता

सध्याच्या परिस्थीवर बोलताना साबिर म्हणाला की, “मला अशा जगात रहायचं नाही, जिथे सर्वकाही धर्माच्या आसपास चालू असतं” साबिर हुसैन यांनी हा निर्णय फक्त स्वत:पुरता घेतला आहे. पत्नी आणि मुलांना जो कुठला मार्ग निवडायचा असेल, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे असं साबिरने सांगितलं.