
देशात किंवा कुठल्याही राज्यात एखाद सरकार सत्तेवर असेल, तर पाच वर्षानंतर त्या सरकार विरोधात एक लाट असते. प्रस्थापित सरकार विरोधी लाट त्याला म्हणतात. अँटी इन्कमबंसी फॅक्टर असतो. पण भाजपचं ज्या-ज्या राज्यात सरकार आहे, तिथे मात्र या उलट ट्रेंड दिसून येतोय. पाच-दहा वर्षानंतरही भाजप त्यांचं शासन असलेल्या राज्यांमध्ये सरकार टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरतोय. भाजपला ही कला चांगल्या पद्धतीने जमली आहे. भाजपची सरकारं 15-20 वर्षानंतरही कायम राहत असताना त्या राज्यात विरोधी पक्ष मात्र कमकुवत होतोय. महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्येही तोच ट्रेंड दिसतोय. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA च सरकार येण्याची चिन्ह आहेत.
सध्याचे जे ट्रेंड आहेत त्यानुसार एनडीए 161 आणि महाआघाडी 77 जागांवर आघाडीवर आहे. हा मोठा फरक आहे. मूळात म्हणजे नितीश कुमार हे 20 वर्षांपासून मुख्यमंत्री पदावर आहेत. आताही मुख्यमंत्री पदासाठी भाजपने त्यांचाच चेहरा पुढे केला आहे. बिहारमध्ये यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं. सामान्यत: जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होतं, ते सत्ता उलथवण्यासाठी असतं. पण बिहारमध्ये मात्र उलटं घडतय. हे वाढलेले मतदान नितीश कुमार आणि भाजपची सत्ता टिकवण्यासाठी आहे. हा मोठा फरक आहे.
एनडीएमध्ये तुल्यबळ दोस्ती
महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करण्यात आले. त्याचा हा परिणाम आहे हे मान्य आहे. कारण यावेळी महिलांची मतदानाची टक्केवारी जास्त आहे. पण 20 वर्षानंतरही सरकार विरोधात जनमत बनवता येत नाही, हे विरोधी पक्षांच मोठ अपयश आहे. खासकरुन काँग्रेसची साथ राष्ट्रीय जनता दलासाठी काही फायद्याची नाहीय. याउलट एनडीएमध्ये भाजप आणि जनता दल युनायटेड यांची दोस्ती तुल्यबळ आहे. दोघांमधील आघाडीवर असलेल्या जागांच अंतर फार कमी आहे.
काँग्रेसमुळे आरजेडीचा फायदा कमी नुकसान जास्त
याउलट आरजेडी 50 पेक्षा जास्त तर काँग्रेसच्या जागांचा आकडा 10 च्या आत आहे. म्हणजे आरजेडी सोबत नसेल तर काँग्रेसची अवस्था यापेक्षा वाईट होऊ शकते. आघाडीमध्ये तुल्यबळ पार्टनर नसेल, एकटा खेळून किती खेळणार असा प्रश्न निर्माण होतो. उलट काँग्रेसमुळे आरजेडीचा फायदा कमी नुकसान जास्त होतय.