हारलेल्या जागांवर गेम फिरवणार? तावडे, संतोष आणि नवीन यांचा मास्टर प्लान काय?

भाजप 2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच सज्ज झाला आहे. 2022 मध्ये गमावलेल्या जागा पुन्हा जिंकण्यासाठी विनोद तावडे, बी.एल. संतोष आणि नितीन नवीन यांनी मास्टर प्लान तयार करणार आहेत. पश्चिम यूपी, अवध आणि कानपूर या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करून, संघटनात्मक बळकटी आणि सामाजिक समीकरणे साधत भाजप आपला गड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

हारलेल्या जागांवर गेम फिरवणार? तावडे, संतोष आणि नवीन यांचा मास्टर प्लान काय?
vinod tawde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2026 | 11:37 AM

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका 2027मध्ये होणार आहेत. या निवडणुकांना अजून बराच अवकाश आहे. मात्र, भाजपने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे 2022मध्ये उत्तर प्रदेशात भाजपने ज्या जागा गमावल्या होत्या, त्या जागांवर भाजपने फोकस केला आहे. त्यासाठी भाजपचे तीन नेते मैदानात उतरणार आहेत. हे तिन्ही नेते या हरलेल्या जागांसाठीचा मास्टर प्लान तयार करत आहेत. या तीनजणांच्या टीममध्ये विनोद तावडे यांचाही समावेश आहे.

भाजपचे प्रदेश प्रभारी विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला. त्यांच्यापाठोपाठ आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांचाही उत्तर प्रदेशचा दौरा होणार असून हा अत्यंत महत्त्वाचा दौरा असल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे त्यानंतर पुन्हा एकदा तावडे हे उत्तर प्रदेशात जाऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. थोडक्यात उत्तर प्रदेश काबीज करण्यासाठी विनोद तावडे, बी. एल. संतोष आणि नितीन नवीन यांची तिकडी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

सामाजिक समीकरणारवर फोकस

नितीन नवीन त्यांच्या दौऱ्याची सुरुवात पश्चिम यूपीतून सुरू करणार आहे. तर बीएल संतोष हे राजधानी लखनौमधून संघटनात्मक तयारीची पाहणी करणार आहे. विनोद तावडे हे 2027साठी संघटना आणि सामाजिक समीकरण यावर फोकस करणार आहेत. हे तिन्ही नेते 2022मध्ये पराभूत झालेल्या जागांवर अधिक फोकस करणार असून या जागा जिंकण्यावर भर देणार आहेत. अशा पद्धतीने भाजपची टॉप लीडरशीप उत्तर प्रदेशचा गड कायम राखण्यसाठी काम करणार आहेत.

नितीन यांचं लक्ष्य पश्चिम यूपी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे राज्यातील सहा संघटनात्मक क्षेत्रांचा दौरा करणार आहेत. या सहा ठिकाणच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन ते कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचं काम करणार आहे. नितीन नवीन आपल्या दौऱ्याची सुरुवात पश्चिम उत्तर प्रदेशातून करणार आहेत. 12 ते 13 सप्टेंबर दरम्यान मेरठपासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे.

राजकीय समीकरणं साधण्यापाठोपाठच 2022 ची विधानसभा निवडणूक आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ज्या जागा गमावल्या आहेत, त्या जागा कशा जिंकता येईल यावर भर देण्याचं काम नितीन नवीन यांचं असणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात 71 विधानसभेच्या जागा आहेत. या जागांवर सामाजिक समीकरण आणि गुर्जराच्या व्होट बँकेवरही नवीन यांचा भर असणार आहे. विशेष म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरचा नवीन यांचा हा पहिलाच पश्चिम यूपीचा दौरा आहे.

संतोष यांचा फोकस अवध आणि कानपूरवर

भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष हे लखनौला जाऊन अवध आणि कानपूर क्षेत्रात संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहे. 10 आणि 11 सप्टेंबर रोजी संतोष यांचा लखनौचा दौरा होणार आहे. यावेळी ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांचीही भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

बीएल संतोष हे अवधमधील 82 आणि कानपूरमधील 52 विधानसभेच्या जागांवर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. 2024मध्ये अवध विधानसभा मतदारसंघातील अनेक जागांवर भाजपचा पराभव झाला होता. हा भाजपसाठी मोठा झटका होता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अवधमधील भाजपच्या दोन माजी विधान परिषद सदस्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमद्ये प्रवेश केला आहे. तसेच माजी खासदार कौशल किशोरही पक्षात नाराज आहेत. त्यामुळे भाजपसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. त्यामुळे संतोष हे लखनौला जाऊन पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचं काम करणार आहेत.

तावडे अ‍ॅक्शन मोडमध्ये

विनोद तावडे ही उत्तर प्रदेशात जाऊन राज्यातील राजकीय परिस्थिती जाणून घेणार आहे. त्यामुळेच ते दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. क्षेत्रीय टीम स्थापन केल्यानंतर प्रत्यक्षात कार्यकर्त्यांमध्ये जाऊन आणि मतदारांशी संवाद साधून तावडे पक्ष बांधणीचं काम करणार आहेत. तसेच 2022च्या विधानसभा आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर पराभव झाला त्या जागांचा फिडबॅकही हे तीन नेते घेणार आहेत. तसेच एनडीएच्या मित्र पक्षांशी चर्चा करून पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यामुळेच या तिकडीच्या उत्तर प्रदेशातील दौऱ्याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us