
नरभक्षक राजा कोलंदर आणि त्याचा मेव्हणा बच्छराज कोल या दोघांच्या कृत्येने देश हादरला होता. दोघांनी माणुसकीला काळिमा फासली. हे दोघे खून करायचे. नंतर तो मानवी मृतदेह खायचे. मृतदेहाच्या डोक्याचे सूप करून प्यायचे. या सीरीयल किलर, नरभक्षक कोलंदरला मानवाच्या खोपड्या, कवट्या जमा करण्याचे पण व्यसन होते. त्याने 14 जणांना मारल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
दोघांना जन्मठेपेची शिक्षा
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील न्यायालयाने सीरिअल किलर, नरभक्षक राजा कोलंदर आणि बच्छराज कोल या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या दोघांना वर्ष 2000 मध्ये एका दुहेरी हत्याकांडात कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. लखनऊ येथील कोर्ट क्रमांक-5 मधील न्यायाधीश रोहित सिंह यांनी शुक्रवारी दोन्ही आरोपींना ही शिक्षा सुनावली. दोघांना अडीच लाख प्रत्येकी दंडही भरावा लागणार आहे.
काय होते प्रकरण
राजा कोलंदर आणि बच्छराज कोल या दोघांनी 2000 मध्ये 22 वर्षीय मनोज कुमार सिंह आणि चालक रवी श्रीवास्तव यांचे अपहरण केले होते आणि त्यांची हत्या केली होती. हे दोघे 24 जानेवारी 2000 रोजी लखनऊ येथून रीवा येथे जाण्यासाठी निघाले होते. रायबरेलीमधील हरचंद्रपूर येथील एका चहाच्या ठिकाणी ते शेवटचे थांबले होते. त्यानंतर तिथून ते गायब झाले. त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. त्यांचे छिन्न-विछिन्न मृतदेह प्रयागराज येथील शंकरगडच्या जंगलात सापडले होते. या खूनामागे राजा कोलंदर आणि कोल असल्याचे समोर आले. 25 वर्षांपूर्वी पोलिसांनी दोघांविरोधात दुहेरी हत्याकांडात गुन्हा नोंदवला होता. 21 मार्च 2001 मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. पण कायदेशीर प्रक्रियेतील अडचणी वाढल्याने या प्रकरणाची सुनावणी 2013 मध्ये सुरू झाली होती.
फार्महाऊसवर सापडल्या 14 मानवी कवटी
2012 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. पत्रकार धीरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणात त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यावर राजा कोलंदर याच्या फार्महाऊसवर 14 मानवी खोपड्या मिळाल्या होत्या. तेव्हा राजा कोलंदर हा नरभक्षक असल्याचे समोर आले होते. तो मृतदेह खायचा आणि डोक्याचं सूप प्यायचा असा आरोप आहे.