Corona Update : कोरोनाची पुन्हा मोगलाई; दिल्ली, हरियाणा, केरळ आणि कर्नाटकासह या राज्यात नवीन रुग्ण, घरातील मास्क बाहेर येणार?
Corona New Cases In India : देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या राज्यांनी ॲडव्हायजरी, सतर्कतेचा सल्ला दिला. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली.

देशातील अनेक राज्यात कोविड-19 च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झाले आहेत. त्यांनी नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सरकारने ॲडव्हायजरी, सतर्कतेचा सल्ला दिला आहे. सर्व रुग्णालयांना सुद्धा अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. कोविडशी दोन हात करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीत तीन वर्षांनी कोरोनाचे प्रकरण समोर येत आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात, हरियाणा, केरळ, कर्नाटक आणि इतर राज्यात कोविड-19 चे नवीन प्रकरण समोर येत आहेत.
काल मुंबईत दिवसभरात 35 कोरोना रुग्ण
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होत असून शुक्रवारी (23 मे) नवीन 45 रुग्णांची नोंद झाली. यामध्ये एकट्या मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 185 पर्यंत पोहोचली आहे. यामुळे मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला असून त्यांनी विविध रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था केली असून गरज पडल्यास आरोग्य सेवेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुंबई शहरात मे महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र हे सर्व रुग्ण फ्ल्यू आणि सहव्याधी असलेले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले.
जानेवारी 2025 पासून राज्यात एकूण 6,819 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 210 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात केवळ मुंबई विभागात एकूण 185 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 81 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
ठाण्यात कोरोनाचे १० रुग्ण
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे १० रुग्ण आढळले असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तेथे टेस्टिंग कीटही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी १९ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. आरटीपीसीआरची सुविधाही कळवा येथे उपलब्ध करण्यात आले आहे.
कोणते व्हेरिएंट या राज्यात?
नवीन कोरोना लाटेत ओमिक्रॉनचा JN.1 व्हेरिएंट आणि त्याचे सर्व व्हेरिएंट्स LF.7 आणि NB.1.8 जबाबदार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) JN.1 ला डिसेंबर 2023 मध्ये व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट जाहीर केला होता. हा व्हेरिएंट जास्त संक्रमक असल्याचे दावा करण्यात येत आहे. अर्थात हा इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक नाही. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, घश्यात खवखव होणे आणि शारीरिक दुखणे अशी लक्षणे दिसतात.