Hanuman Jayanti Advisory : समाजकंटकांवर लक्ष ठेवा… हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गाईडलाइन जारी जारी; काय आहेत आदेश?

देशभरात उद्या हनुमान जयंती साजरी होणार आहे. त्यामुळे हनुमान जयंतीच्या शोभा यात्रेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Hanuman Jayanti Advisory : समाजकंटकांवर लक्ष ठेवा... हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गाईडलाइन जारी जारी; काय आहेत आदेश?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 05, 2023 | 2:37 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालच्या काही भागात रामनवमीच्या दिवशी हाणामारी होऊन तणाव झाला. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये तर प्रचंड हिंसा झाली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. देशभरात उद्या हनुमान जयंती (Hanuman Jayanti Advisory) होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. खास करून समाजकंटकांवर लक्ष ठेवण्याचे आदेश या मार्गदर्शक सूचनेतून देण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्विट करून ही मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. राज्य सरकारांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखावी. शांततेत उत्सव साजरा करावा. सामाजात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर लक्ष ठेवा. तसेच धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या, असं या मार्गदर्शक सूचनेत केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

मागच्यावेळी झाली होती दगडफेक

उद्या हनुमान जयंती होत असल्याने दिल्ली पोलीसही सतर्क झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या जवानांनी हनुमान जयंती पूर्वीच आज जहांगीरपुरी परिसरात फ्लॅग मार्च काढला. जहांगीरपुरीमध्ये दिल्ली पोलिसांशिवाय पॅरा मिलिट्री फोर्सचे जवानही यावेळी उपस्थित होते. गेल्या वर्षी जहांगीरपुरी परिसरातील जी ब्लॉकमध्ये हनुमान जयंतीच्या शोभा यात्रेवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे दंगल भडकली होती. मशिदीसमोरून ही शोभायात्रा निघाली होती.

त्या भागात शोभायात्रा नको

हनुमान जयंतीबाबत कोलकाता उच्च् न्यायालयानेही पश्चिम बंगाल सरकारला निर्देश दिले आहेत. बंगाल सरकारने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखावी. राज्यात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करा, असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले होते. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्या भागात शोभा यात्रा काढू नये, असे आदेशच कोर्टाने दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये रामनवमीच्या दिवशी हिंसा भडकली होती. समाजकंटकांनी या दोन्ही जिल्ह्यात प्रचंड दगडफेक केली होती. तसेच अनेक ठिकाणी जाळपोळ केली होती. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगवताना लाठीमार करावा लागला होता. मात्र, जमाव मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना आवरणं पोलिसांना अशक्य झालं होतं. त्यामुळे पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. सध्या परिस्थितीत नियंत्रणात असली तरी उद्या हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालय अलर्ट झालं आहे.